दिलीप मानेंना एकटे पाडणारे ते बलाढ्य नेते कोण?; माजी आमदारांच्या गौप्यस्फोटाने चर्चेला उधाण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून मोर्चेबांधणी आणि प्रचाराने वेग घेतला आहे. दोन्ही गटाचे नेते बाजार समितीचे मतदार आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अशाच एका मेळाव्यात बोलताना माजी आमदार दिलीप माने यांनी 'बलाढ्य नेत्यांनी मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला,' असा गौप्यस्फोट केला आहे. आता दिलीप माने यांना एकटे पाडणारे बलाढ्य नेते कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे दोन माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख एकत्र आले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांच्यासह काँग्रेसमधील काही मातब्बर मंडळी आहेत.
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बोलताना दिलीप माने यांनी आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे नेतृत्व मानतो. मला बलाढ्य नेत्यांनी एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वांना सोबत घेऊन बाजार समितीसाठी आघाडी केली आहे, असे माने सांगितले.
दरम्यान, माजी आमदार दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.काँग्रेसकडून त्यांची उमेदवारीही जाहीर झाली होती. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नव्हता. विशेष म्हणजे एबी फॉर्म सोलापूरमध्ये आलाही होता. मात्र, तो त्यांना देण्यात आला नव्हता, हे काँग्रेसच्या शहराध्यक्षांनीच सांगितले होते. तीही खंत माने यांच्या मनात आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत दिलीप मानेंना पत्रकारांनी भाजपसोबत जाण्याबाबत काँग्रेस पक्षनेत्यांशी बोलणे झाले आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी सहकार क्षेत्रात आपण स्वयंभू असल्याचे म्हटले होते,त्यानंतर काँग्रेसमधून सूत्रे फिरल्याची चर्चा आहे, तोही संदर्भ मानेंच्या विधानामागे असावा, अशी चर्चा रंगली आहे.
0 Comments