शरद पवार गटात भूकंप! जयंत पाटलांकडून
सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द, अंतर्गत वाद उफाळला?
पुणे (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या निर्णयामागे पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील पानिपत स्मारकाच्या मुद्द्यावरून झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१६ एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारतर्फे प्रस्तावित शौर्य स्मारकाला समर्थन न देण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. मात्र, मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करत स्मारकाला पाठिंबा जाहीर केला होता. तपासे यांचे आजोबा, माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी यापूर्वीच पानिपत येथे शौर्य स्मारक उभारले आहे. त्यामुळे तपासे यांनी सरकारच्या स्मारकाला पाठिंबा देऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार महेश तपासे यांना मुख्य प्रवक्तेपदावरून हटवण्यासाठी सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा डाव खेळण्यात आला. हा वाद पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांचे द्योतक मानला जात आहे.
0 Comments