अखेर घंटागाडी चालक- कामगारांचा संप मिटला
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी किमान वेतनासह पीएफ, ईएसआय देण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संप अखेर दुसऱ्या दिवशी मिटला. महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी मक्तेदार आणि घंटागाडी कामगारांची बैठक घेऊन निर्णायक तोडगा काढला. यामुळे शनिवारपासून सकाळी घंटागाडी कामगार पूर्ववत कामावर रुजू होणार आहेत. शहरात महापालिकेने घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन करण्याचा मक्ता नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे. या घंटागाडीवर चालक आणि मदतनीस असे कामगार कार्यरत आहेत. किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही. काही तक्रार अथवा नाराजी व्यक्त केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. भविष्य निर्वाह निधी, ईएसआयची रक्कम कपात केली जाते, मात्र ती संबंधित कार्यालयात जमा केली जात नाही, असे सांगत कामगारांनी संप पुकारला होता. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी महापालिकेसमोर घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. न्याय मिळाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली होती. यावरून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कार्यालयात संबंधित मक्तेदारांची बैठक घेतली. आवश्यक त्या स्पष्ट सूचना दिल्या. यानंतर शनिवारी सकाळपासून घंटागाडी कामगार पूर्ववत कामावर रुजू होतील, असे सांगण्यात आले.
चौकट 1
१ एप्रिलपासून मक्तेदार देणार किमान वेतन संबंधित मक्तेदार आणि घंटागाडी कामगार यांची संयुक्त
बैठक घेतली. या बैठकीत किमान वेतनप्रमाणे घंटागाडी कामगारांना वेतन देण्याच्या स्पष्ट सूचना मक्तेदारांना केल्या. दोन्ही बाजूंनी सूच मान्य करण्यात आल्या. १ एप्रिलपासून किमान वेतनप्रमाणे
वेतन देण्याचे मक्तेदारांनी मान्य केले आहे. सकारात्मक निर्णय झाला, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली.
0 Comments