मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांची जि.प.शाळेला भेट
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- 16 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील व कार्यालयीन विस्ताराधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा यांची पाहणी केली.नवोदय प्रवेशित विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कारासाठी स्वतःहून आलेले उपरोक्त अधिकारी यांच्या कौतुकाने विद्यार्थी,पालक व सर्व शिक्षक आनंदित झाले. प्रथमतः कन्या शाळेमध्ये संपूर्ण परिसराची पाहणी करून, आदर्श अशा वाचनालयास मैनक घोष यांनी भेट दिली. सुसज्ज असे वाचनालय व ते वापरात आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी सातवीतील मुलींनी संविधानाची विविध कलमे सांगितली. धनश्री बालाजी जमाले या विद्यार्थीनीने संविधानातील सर्व कलमे म्हणून दाखवली.पदवीधर संजय देशटवाड यांनी वाचनालयाची कार्यपद्धती समजून सांगितली.त्यानंतर पाचवी स्पर्धा परीक्षेच्या वर्गाला भेट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थिनींची संवाद साधला.यावेळी दोन्ही शाळेच्या वतीने संविधानाची प्रत भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी यांचा सन्मान प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय मगर,कन्या शाळा मुख्याध्यापक रहिमान सय्यद शाळा समिती अध्यक्ष अमोल पवार, सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या वतीने पुरवण्यात आलेल्या इंटरऍक्टिव्ह बोर्डचा दैनंदिन अध्ययन- अध्यापनामध्ये होणारा उपयोग याची माहिती घेतली. इंटरॅक्टिव्ह बोर्ड कशा पद्धतीने उपयुक्त आहेत याबाबत रहिमान सय्यद यांनी माहिती सांगितली.जगन्नाथ धायगुडे,शहाजी पुरी व बाळासाहेब जमाले यांचे युट्युब वरील व्हिडिओ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या वर्गात दाखवले जातात याबाबत माहिती दिली.नवोदय शिष्यवृत्ती चा तडवळा पॅटर्न याबाबत जगन्नाथ धायगुडे यांनी सविस्तर माहिती सांगितली. विद्यार्थ्यांची निवड,परगावच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश, चौथीच्या विद्यार्थ्यांना सुरू असलेले मार्गदर्शन, पालकांचे लोकवाट्यातून सहकार्य याबाबत सविस्तर सांगितले.तसेच नवोदयचा यावर्षीचा निकाल नोंदवून ठेवला गेला तसेच दोन्ही शाळेतील मिळून शिष्यवृत्तीचा निकाल कसा लागेल याची माहिती दिली. शहाजी पुरी यांनी शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थी बँकेची माहिती दिली.जवाहर नवोदय विद्यालय साठी प्रवेशित झालेल्या 15 विद्यार्थ्यांचा सत्कार मैनक घोष , अशोक पाटील, दत्तप्रसाद जंगम यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांसह सत्कार करताना धातूंचे रहस्य हे पुस्तक भेट देण्यात आले.विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना शाळेच्या अडचणी समजून घेतल्या. समितीचे अध्यक्ष सोमनाथ भोसले,अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष धनके यांनी भौतिक सुविधाबाबत चर्चा केली. नवोदय प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार मराठी उतारे हे पुस्तक भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक जगन्नाथ धायगुडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रवीण गाडे तर आभार बाळासाहेब जमाले यांनी मानले.
0 Comments