दहीगावचे पाणी पेटले; ७ एप्रिल रोजी शेतकऱ्यांचा रस्ता रोकोचा इशारा
करमाळा, (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी आवर्तन सुरू होऊन १० दिवस लोटले तरी अद्याप टेल भागात पाणी पोहोचलेले नाही. उजनी धरण वेगाने वजा पातळीकडे जात असताना जाणीवपूर्वक टेल भागाला डावलले जात असून नियम पायदळी तुडवले जात आहेत. घोटी, निंभोरे, लव्हे या भागातील ग्रामपंचायतीवरती माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व असल्यामुळे या भागाला राजकीय द्वेष भावनेतून डावलले जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.१२ च्या अधिकाऱ्यांना आज लेखी निवेदन देऊन दि.६ एप्रिल पर्यंत टेल भागात पाणी न पोहोचल्यास ७ तारखेला रास्ता रोको आंदोलन केला जाईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या धामधुमीतच दहिगावचे पाणी पेटले आहे.
निंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळेकर यांनी ग्रामपंचायत निंभोरे च्या वतीने जे निवेदन दिले आहे त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील टेलचे शेतकरी विनंतीपूर्वक अर्ज करतो की, आम्ही आपल्या कार्यालयाकडे रीतसर पाणी मागणी अर्ज दिलेले असून दि.२० मार्च रोजी सुरू झालेले दहिगाव योजनेचे उन्हाळी आवर्तन अद्यापही टेल भागांमध्ये पोहचलेले नाही.
योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये नसलेल्या गावांना सर्रास पाणी दिले जात आहे. टेल भागातील लव्हे, निंभोरे, घोटी इत्यादी गावांना राजकीय द्वेष भावनेतून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी आपल्याला विनंती आहे की दि.६ एप्रिल २०२५ पर्यंत टेल भागातील आमच्या गावांना पाणी सोडावे अन्यथा दि.७ एप्रिल २०२५ रोजी आम्ही करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करू याची नोंद घ्यावी ही विनंती.
0 Comments