माढ्यात मुलीचे जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत
शिंदे कुटुंबियांनी हलग्या फटाक्यांची आतषबाजी करत केले स्वागत
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्या समाजात 'मुलगी नको मुलगा हवा', मुलगी म्हणजे खर्चाला भार या विचाराने तिला नकोशी केली जाते आणि मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत असताना मात्र माढा शहरातील शिंदे कुटुंबियांनी घरात जन्मलेल्या पहिल्या मुलीचे स्वागत हलग्यांच्या कडकडाटात,फटाक्यांची आतषबाजीसह मिठाई वाटत मायलेकींचे औक्षण करून अनोख्या पद्धतीने करत समाजापुढे आदर्श मांडला आहे.
माढा येथील जयदीप शिंदे व भाग्याश्री शिंदे या दाम्पत्यांला पहिलीच मुलगी झाली. घरात पहिलेच कन्यारत्न जन्मल्याने शिंदे कुटूंबियांच्या आनंदाचा पारा उरला नसून, जन्मलेल्या बाळाला घरी आणण्यासाठी गाडीवर फुलांची आरास करत. घराजवळ आल्यानंतर हलग्यांच्या कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, घरात सर्वत्र फुलांची सजावट करून मायलेकीचे औक्षण केले. तसेच तृतीयपंथी आणि माढा नगरपंचायत च्या महिला सफाई कामगारांना गोडधोड व साडीचोळीचे वाटप करत अनोख्या पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे. जयदीप यांचे मोठे बंधू संदीप यांना दोन मुलेच असल्याने, शिंदे कुटुंबियांना घरात एकतर मुलगी असावी अशी खुप अपेक्षा होती. त्यांची हि इच्छा या कन्यारत्नाने पुर्ण झाली असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
समाजात एकीकडे मुलगी जन्मली की, सासरच्या मंडळींकडून मायलेकीचा तिरस्कार केल्याच्या कित्येक घटना पहायला मिळत असताना, दत्तात्रेय शिंदे व शारदा शिंदे या सासु सासर्यांनी सुनेचे व नातीचे गृह आगमनाचा केलेला हा आगळावेगळा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यांचे सर्वंच स्तरातून कौतुक केले जात आहे.
0 Comments