उद्धव ठाकरेंचा फोटो फाडणाऱ्या कार्यकर्त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-केंद्र सरकारच्या वफ्क सुधारणा कायद्याला विरोध केला म्हणून ओंकार चव्हाण या कार्यकर्त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडून आंदोलन केले. ओंकार चव्हाण यांच्याविरोधात उद्धवसेनेच्या नेत्यांनी फौजदारी चावडी पोलिसांत तक्रार केली.
ओंकार चव्हाण आणि त्यांचे सहकारी दुपारी साडेबारा वाजता चार हुतात्मा पुतळ्याजवळ जमले. आपण उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यादरम्यान, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी आणि सहकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. ओंकार चव्हाण हे भाजपचे हस्तक आहेत. ओंकार चव्हाण यांना पक्षाच्या पदावरून यापूर्वीच हटवण्यात आले होते. आता पक्षाशी कोणताही संबंध नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचा फोटो फाडून चव्हाण याने शिवसैनिकाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दासरी यांनी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण , महेश धाराशिवकर, दत्तात्रय वानकर, दत्ता माने, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, चंद्रकांत मानवी, आदी उपस्थित होते.
0 Comments