राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत;
फसवणुकीच्या गुन्हयात ५४ जणांवर गुन्हा दाखल
नगर (कटूसत्य वृत्त):-राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे ९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक २००४-०५ आणि २००७ या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बेसल डोस वाटपाच्या कारणास्तव राष्ट्रीयकृत बँकेकडून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे न देता, या रकमेचा गैरवापर केला गेला आणि नंतर कर्जमाफीच्या माध्यमातून ते कर्ज माफ करून घेण्यात आले.
ही तक्रार कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून, आठ आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तत्काळ कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचेही कोर्टाने सांगितले आहे.
कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली असून, राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments