Hot Posts

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींनी हे काय करुन ठेवलं? राज्याची तिजोरी रिकामी : 1 लाख 32 हजार कोटींचं कर्ज काढणार

 लाडक्या बहिणींनी हे काय करुन ठेवलं? राज्याची तिजोरी रिकामी : 

1 लाख 32 हजार कोटींचं कर्ज काढणार

 मुंबई (कटूसत्य वृत्त):-विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली. मात्र याच योजनेमुळे सरकारवर कर्जाचा डोंगर होत असल्याची माहिती आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाडकी बहिण योजनेमुळे सरकारला दर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागत होते. त्यानंतर सरकारने या योजनेची कडक अमंलबजावणी करत लाखो अपात्र लाडक्या बहिणींना वगळलं. परंतु तोपर्यंत सरकारची बरीच तिजोरी रिकामी झाली. त्यामुळे सरकारवर आता अधिकचे कर्ज काढण्याची वेळ आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. महसुली उत्पन्नाच्या उद्दिष्टानुसार तिजोरीत दरमहा सरासरी 43 हजार कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात एक लाख 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे परवानगी मागितली आहे. तुर्तास सरकारने 13 हजार कोटींचे कर्ज काढले आहे. यंदाच्या कर्जामुळे सरकारकडील कर्जाची रक्कम साडेनऊ लाख कोटींवर जाईल, अशी माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे.राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नाच्या  सुमारे तीन टक्क्यांपर्यंतची रक्कम राज्य सरकारला कर्जरूपाने उचलण्याची केंद्र सरकारकडून परवानगी असते. याच आधारावर राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात अंदाजे एक लाख 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर, राज्य सरकार दर आठवड्याला किंवा महिन्याला किती कर्ज घेतले जाईल, याचा कालावधी आणि रक्कम निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कॅलेंडर तयार करणार आहे. सध्या सरकारला दरमहा तीन ते चार हजार कोटी रुपयांची आर्थिक गरज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments