Hot Posts

6/recent/ticker-posts

खरा आका निलेश राणेच ! चौकशी लावाच, वैभव नाईक यांचं खुलं आव्हान

 खरा आका निलेश राणेच ! चौकशी लावाच, वैभव नाईक यांचं खुलं आव्हान

 सिंधुदुर्ग (वृत्त सेवा ):-जिल्ह्यात सध्या सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांचे फोटो सोशल मिडियावर टाकत गंभीर आरोप केले होते. ज्याला निलेश राणे यांनी पलटवार करताना आता याची चौकशी लावली जाईल, तुम्हाला जेलवारी घडवू असा इशारा दिला होता. यानंतर आता वैभव नाईक यांनी राणेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करताना, तेच येथील आका असल्याचे म्हटलं आहे. ज्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

बिडवलकर हत्या प्रकरणात सिद्धेश शिरसाटला पकडल्यानंतर आपण सवाल उपस्थित केले होते. त्यावेळी आमदार निलेश राणे यांनीच पोलीस अधीक्षकांना दोन वर्षांपूर्वीची प्रकरणे आता का काढता? जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अवैध धंदे पहिल्यांदा बंद करा असे म्हणत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यावर आरोप केले त्यावरही कोणताही ठोस पुरावा किंवा ते बोलू शकलेले नाहीत. त्यामुळे बिडवलकर हत्या प्रकरणात खरा आका निलेश राणेच असून त्यांचीच आता चौकशी लावली पाहिजे, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

निलेश राणे यांनी आधी आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासावी, मग त्यांना बिडवलकर कुटुंबावर किती वाईट वेळ त्यांनी आणलीय हे कळेल. काल त्यांनी सिद्धेश शिरसाटसोबत माझा फोटो दाखवला पण माझे फोटो कुठेच नाहीत. परंतु सिद्धेश शिरसाटसोबत त्यांचे फोटो त्यांच्याच ट्विटर अकाउंटवर आहेत. त्यामुळे या प्रकरणात निलेश राणेच आका असल्याचा हल्लाबोल देखील नाईक यांनी केला आहे.

तसेच राणेंनी आता आपणच या प्रकरणात थेट उतरणार असून आधी वैभव नाईक यांच्या चौकशीची मागणी करणार आहे. त्यांना जेलवारी घडवू असे म्हटलं होतं. पण आता माझीच मागणी आहे की त्यांनी माझी चौकशी लावावीच. मी चौकशीला जाण्यासाठी तयार आहे. मला अडकवण्यासाठी सगळी टीम कामाला लागली आहे. या प्रकरणात आकाच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणात ही हत्या उघडकीस आली आहे.

पण जर तुमच्यात हिंमत असेल तर, तुमचे कॉल डिटेल्स जनतेसमोर जाहीर करा. मग सिद्धेश शिरसाटला वाचवणारा का कोण हे जनतेसमोर येईल. दोन वर्षापूर्वीचे प्रकरण पोलीस का उकरता ? अशी विचारणा कोणी केली? आता है प्रकरण आम्ही उचलून धरले म्हणून निलेश राणे टीका आणि दावे करतायत, असाही आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. याच्याआधीही माझ्यावर अंकुश राणे खून प्रकरण, छत्रपती पुतळा दुर्घटनेवरून गंभीर आरोप करण्यात आले होते. पण त्यात काहीच तथ्य नाही. आताही या आरोपांत कोणतेही तथ्य नसून तुमचीच सत्ता आहे. काढा सीडीआर, करा चौकशी, असेही आव्हान त्यांनी दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments