करमाळा (कटूसत्य वृत्त):- राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने दि. ०६ मार्च रोजी राज्यातील संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. यानुसार तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर करण्यात आली असून असून दि. १० मार्च पासून १९ एप्रिल पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया चालणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमोल भोसले (भू संपादन अधिकारी-१, सोलापूर) हे श्री आदीनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पाडणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी एकूण सहा मतदार संघातून २१ सदस्यांच्या निवडणुकीकरिता विविध टप्पे तयार केले असून दि. १० मार्च ते दि. १७ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात (तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय करमाळा) नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. १८ मार्च रोजी छाननी प्रक्रिया होणार असून दि. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. १९ मार्च ते ०२ एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार असून दि.०३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येणार आहे.
दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायं.५ पर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी मतदान घेण्यात येणार असून दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
चौकट-
जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम, रावगाव अशा पाच ऊस उत्पादक सभासद गटांतून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण १५ प्रतिनिधी तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी - १, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी (१), महिला राखीव प्रतिनिधी (२), इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी (१) व भटक्या वि. जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग (१) अशा एकूण ६ मतदार संघांतून एकूण २१ प्रतिनिधी या प्रक्रियेद्वारे निवडण्यात येणार आहेत.
0 Comments