Hot Posts

6/recent/ticker-posts

दुधात भेसळ कराल तर थेट मकोका लागणार! - उपमुख्यमंत्री अजित पवार

 दुधात भेसळ कराल तर थेट मकोका लागणार! - उपमुख्यमंत्री अजित पवार





मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये वाढत्या भेसळीच्या घटनांवर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.

दूध भेसळीविरोधात निर्णायक बैठक
राज्यात दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या घटनांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, तसेच विविध आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या चर्चेत सहभागी झाले.

भेसळ रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
प्रत्येक विभागात दूध तपासणी प्रयोगशाळा सुरू करणार.पनीरमध्ये अॅनालॉग चीज असल्यास दुकानदारांनी ग्राहकांसाठी स्पष्ट माहिती दर्शनी भागात लावावी. भेसळीविषयी जनजागृती मोहीम राबवली जाईल. तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक आणि ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दूध तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा
उपमुख्यमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच, विभागात अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या सोडवण्यासाठी डेअरी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या सेवांचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूर दूध भेसळ प्रकरण,दोषींवर कठोर कारवाई
सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात कोणताही आरोपी वाचणार नाही,असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कोणत्याही पक्षाचा असो, कितीही मोठा असो - दोषींवर तातडीने अटकेची कारवाई केली जावी, असे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

राज्यात भेसळविरोधी कठोर पावले
राज्य सरकारने दूध भेसळप्रकरणी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली असून, भविष्यात असे गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments