Hot Posts

6/recent/ticker-posts

अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं?- आ. अभिजीत पाटील

 अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं?- आ. अभिजीत पाटील





नमामी चंद्रभागा फक्त कागदावरच का?


मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नद्या शुध्दीकरणाचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत 'नमामि गंगा'प्रमाणेच चंद्रभागा नदीचा 'नमामी चंद्रभागा' योजनेंतर्गत समावेश केला होता. मात्र राज्य सरकारने या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने आज माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी नदीपात्रातील अशुद्ध पाण्यासंदर्भात राज्य शासनास धारेवर धरले. नमामि चंद्रभागा ही योजना कागदावरच राहिली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीत पुणे, पिंपरी चिंचवड याठिकाणचे घाण पाणी  यासह नदी भागातील अनेक कारखाने तसेच नगरपालिकांचे सांडपाणी मिसळत आहे. अनेक उद्योगाचे  केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषण मोठी डोकेदुखी बनले आहे. त्यामुळे जलचर प्राण्यांबरोबर नदीकाठच्या ग्रामस्थांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी केंद्र शासनाने नमामी चंद्रभागा या योजनेतून जिल्ह्यातील चंद्रभागा नदी थेट येणार्‍या पाण्याचे शुध्दीकरण करुन ते पाणी नदी सोडण्याचा संकल्प केला होता. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले आहे.
विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणारा भाविक चंद्रभागेच्या घाण पाण्यात स्नान करतो यासाठी शासनाने ३४ कोटी ६५ लाख रुपये खर्चाची जलशुद्धीकरण यंत्रणा नदी पात्रात बसविली परंतु तीही कुचकामी ठरली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड येथून उजनी धरणात येणार घाण पाणी बंद होणार काय? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.

*चौकट:*

चंद्रभागा नदीच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सांडपाणी प्रक्रियेसाठी यंत्रणा उभारणे, भीमा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये राडारोडा टाकण्यास प्रतिबंध करणे, नदीकाठ आणि पात्र यांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन, नदीकाठावरील पूर रेषेतील विहिरींचे मॅपिंग अशी कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे. घाण पाण्यामुळे पंढरपुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. चंद्रभागा नदीच्या पाण्यावर या भागातील अनेक गावे अवलंबून आहेत आणि हेच दुषित पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याच्या दृष्टीने भयावह आहे.नमामी चंद्रभागा योजना हि फक्त कागदावरच का? असा प्रश्न विधानभवनात उपस्थित केला.

Reactions

Post a Comment

0 Comments