कुरुलसह तालुक्याला बेवारस होऊ देणार नाही
कुरुल (कटूसत्य वृत्त):- पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत आपलं सरकार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री माझे मित्र आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शिष्य आहे मी. दोन्ही उपमुख्यमंत्री दमदार कामगिरीचे आहेत. दुर्दैवाने मोहोळ मतदारसंघाचा आमदार आपल्या विचारांचा आला नाही म्हणून काय झालं...? कुरुल सह तालुक्याच्या कोणत्याही विकास कामांसाठी मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे आ.अभिमन्यू पवार यांनी दिली.कुरुल (ता. मोहोळ) येथे आ.अभिमन्यू पवार व डॉ. प्रमोद पवार यांच्यासह पंचक्रोशीतील गुणवंत व यशवंतांचा तसेच शासकीय सेवेत उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आ. राजन पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बी.पी. रोंगे, प्रा. निवृत्ती पवार,दत्तात्रय पवार, जालिंदर लांडे, भाजपचे अंकुश अवताडे, लिंगेश्वर निकम, बाबासाहेब जाधव, माऊली पवार,अॅड. श्रीरंग लाळे, अॅड. महेश जगताप अॅड. श्रीरंग लाळे, अॅड. महेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. राजन पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नक्कीच संधी देतो. घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना अभिमन्यू पवार यांच्यासारख्या युवकाला देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली. या संधीचं सोनं करत गतवेळेस पेक्षा जास्तीच्या मतांचे लीड घेऊन यंदा दुसऱ्यांदा आमदार होऊन त्यांनी आपले कार्य कर्तुत्व सिद्ध केले आहे. मोहोळ मतदारसंघ सध्या बेवारस झाला आहे.तालुक्याची धनी ना गोसावी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वडिलांची जन्मभूमी असलेल्या कुरुलकडे लक्ष न ठेवता संपूर्ण तालुक्याकडे लक्ष ठेवावे, अशी विनंती त्यांनी केली.
कुरुलच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही कुरुल हे माझं नसून माझ्या वडिलांचं जन्मगाव. इथलेच आमचे पवार कुटुंब. या कुटुंबाचा खूप मोठा अध्यात्मिक व धार्मिक वारसा आमच्या पिढीला मिळाला. याच अध्यात्माने मला आमदार केले व जनतेची सेवा करण्याची संधी दिली. हा वारसा पुढे नक्कीच चालू ठेवू. माझ्या दोन्ही निवडणुकीत कुरुलचे शेकडो कार्यकर्ते माझ्यासाठी झटत होते. हा कुरुलकरांचा आशीर्वाद विसरणार नाही आणि यांच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही. - अभिमन्यू पवार, आमदार
0 Comments