Hot Posts

6/recent/ticker-posts

अपघातग्रस्तांकडे अनेक जण बघ्याची भूमिका नाही तर उपचारासाठी मदत करावी

 अपघातग्रस्तांकडे अनेक जण बघ्याची भूमिका नाही 

तर उपचारासाठी मदत करावी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रस्त्यावर झालेल्या अपघातातील अपघातग्रस्तांकडे अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. अशी भूमिका न घेता त्वरित उपचारासाठी मदत करावी. जखमींना वेळेत उपचारासाठी मदत होईल, यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी प्रयत्न करावा. अपघाताची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी, प्रत्येक वेळी ड्रायव्हरचीच चूक असेल असे नाही. यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. मोहोळ पंचायत समिती कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी पेनूर, वरवडे, सावळेश्वर या तिन्ही टोल नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्णालय, खासगी व सरकारी अॅम्बुलन्स, अपघातग्रस्त मदत स्वयंसेवक यांची अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या घटकांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.

मोहोळ तालुक्यातील महामार्गाच्या संख्येमुळे दिवसेंदिवस अपघात वाढत असून नागरिकांनी सहजता बाळगावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी,वाहतूक शाखेचे महादेव रोडे त्याचबरोबर अपघात शाखेचे अतुल क्षीरसागर, चंद्रकांत आदलिंगे, गोपनीय शाखेचे गोपाळ साखरे यांच्यासह कर्मचारी, अॅम्बुलन्स चालक, ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालय, तिन्ही टोल नाक्यावरील कर्मचारी व अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसंगी अनेकांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे नॉर्मल अपघातग्रस्तातील अपघातग्रस्ताला देखील मदत मिळत नसल्याच्या भावना व्यक्त केल्या. विनाकारण सोलापूरला रेफर केले जाते. डॉक्टरांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे. मात्र मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे सुविधांचा अभाव जाणवत आहे. जबाबदारी घेतली जात नाही. खासगी रुग्णालयामध्ये सामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थिती अभावी उपचार घेणे अशक्य होत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा बाबत वरिष्ठ पातळीवरून विचार करून अभाव भरून काढण्यात यावा,अशी मागणी उपस्थितांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments