Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम करावे

 शिक्षकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम करावे



आमदार राजू खरे; तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
पोखरापूर (कटुसत्य वृत्त):-
शिक्षण क्षेत्रात राजकारण येता कामा नये, शिक्षकांनीही राजकीय जोडे बाजूला ठेवून शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार राजू खरे यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे वडवळ (ता. मोहोळ) येथील श्री नागनाथ सांस्कृतिक भवन येथे आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात आमदार खरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख होते.. यावेळी सहा. गटविकास अधिकारी देशमुख, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी,
बंडू शिंदे, केंद्रप्रमुख राजकुमार राऊत, रूपेश क्षीरसागर, श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे, शाहू धनवे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. आमदार खरे पुढे म्हणाले, ज्या क्षेत्रात
आपण काम करतो आणि त्या क्षेत्रातील आदर्श असा पुरस्कार मिळणे ही बाब अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे या पुरस्कारांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसावा. ते पुरस्कार गुणवत्तेप्रमाणे असावेत.
यापुढील काळात मोहोळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात राजकारण चालणार नाही. शिक्षण क्षेत्रात राजकारण आले तर त्याचे बाजारीकरण होईल. त्यामुळे शिक्षकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता
वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. जि.प. शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले, या पुरस्कार सोहळ्यामुळे शिक्षकांना अधिक प्रेरणा मिळेल. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे हक्काने शाळेत येतात. त्यांना संस्कार देऊन त्यांचे मन आणि मनगट
बळकट करून शैक्षणिक प्रगती करावी. शाळेत काम करताना शिक्षकांनी कोणतेही मतभेद ठेवू नये. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व नावलौकिक समाजात वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रास्ताविक
गटशिक्षणाधिकारी महाडिक यांनी केले. सूत्रसंचालन महादेव माने यांनी तर मल्लिनाथ स्वामी यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments