संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे - सुदीप चाकोते
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून, या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूने गावासह समस्त समाज हळहळ व्यक्त करत आहे.
राष्ट्रीय वीरशैव लिंगायत समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना सांत्वना दिली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, समस्त लिंगायत समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
सुदीप चाकोते यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, या हत्येचा तातडीने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.
या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, गावकऱ्यांनी आणि समाजबांधवांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पूर्ण मदत आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0 Comments