आमदार खासदारांना ठोकण्याचा इशारा, शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा तापणार?
कोल्हापूर (वृत्त सेवा ):- कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा, अशी अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी या मागणीला जोर आला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या आमदारांकडून नामविस्तारांची मागणी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये करण्यात आली. मात्र, या मागणीला कोल्हापूरकरांनी विरोध करून आक्रमक भूमिका घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला कोण कोणी तरी बाहेरून येऊन लुंग्या सुंग्या हात घालत असेल आणि शिवाजी विद्यापीठाचा नाम विस्तार करण्याची मागणी करत असेल तर त्याला ठोकून काढण्याचा गर्भित इशारा कोल्हापुरात झालेल्या 'शिवप्रेमी'च्या बैठकीत देण्यात आला.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा, या मागणीसाठी सोमवारी हिंदुत्ववादी संघटनाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवाय 17 मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र विद्यापीठाच्या नामविस्ताराला कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून विरोध केला असून त्यासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे देखील उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाला हेच नाव देण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. पण कोण बाहेरून येऊन विद्यापीठाचा नाम विस्तार करत असेल तर त्याला वेळप्रसंगी ठोकू, असा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे. नाम विस्ताराला समर्थन देणाऱ्या खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अशोकराव माने यांचा या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला.
शिवाजी महाराजांचे नाव सन्मानाने घ्यावे, ही मागणी धरून ज्यांनी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, असे करावे अशी मागणी केली आहे. ते प्रशांत कोरटकर यांनी अपमान केल्यानंतर कुठे गेले होते. असा सवाल बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दरम्यान, 17 मार्च रोजी हिंदुत्ववादी संघटनांकडून दसरा चौक येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. तर त्याला विरोध म्हणून शाहू सेनेने देखील इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापणार असून सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 Comments