महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सभापतींविरोधात करणार गेम?
कामकाज चुकीच्या पद्धतीनं! राम शिंदेसह चित्र वाघ यांच्यावर विरोधकांचा आरोप
मुंबई (कटूसत्य वृत्त):- विधीमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येताना दिसत आहेत. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये वातावरण तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेत आज चांगला गोंधळ झालेला बघायला मिळाला. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ विश्वास प्रस्ताव सादर केला. या विश्वास प्रस्तावावर विरोधकांनी विरोध केला. दरम्यान, हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले.
यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी सभागृहाच्या कामकाजांवर बहिष्कार टाकला. विरोधक उद्या कामकाजात सहभागी होणार आहेत. पण ते उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे उपसभापती नीलम गोऱ्हे या उद्या डायसवर बसल्यास कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी सभापतींवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
विधान परिषदेत नेमकं काय घडलं?
विधान परिषदेच्या कामकाजांवर विरोधकांनी आज बोट ठेवलं. उपसभापतींच्या समर्थनार्थ कुठल्या नियमाखाली विश्वास प्रस्ताव आणला? असा सवाल विरोधकांनी केला. अविश्वास प्रस्तावासाठी नियम असतील तर विश्वास प्रस्तावाचं काय? असा सवाल विरोधकांनी केला. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींचा विश्वास प्रस्ताव मांडला. त्यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याचा आरोप केला आहे. तालिका सभापतींनी रुलिंग न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
अंबादास दानवे काय म्हणाले?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव ठेवल्यानंतर आम्ही त्यावर पोल मागितला. पोल दिला गेलेला नाही. सभागृहात भूमिका मांडू न देता त्यांनी रेटून हा प्रस्ताव मंजूर केला. त्याला आम्ही विरोध केला. हे सगळं होत असताना राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात होते. सभापतींनी प्रत्यक्ष डायसवर न येता, त्यांनी तालिका सभापतींना बसवलं. त्यामुळे आम्ही आज सभापतींवरही अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. कारण त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना सभापती पदापासून दूर करावा, असा प्रस्ताव मांडला आहे", अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
0 Comments