बार्शीच्या सराफ व्यापाऱ्यास ३८ लाख ४० हजारांचा गंडा
बार्शी (कटूसत्य वृत्त):- शहरातील मोहित अलंकार या सराफी दुकानातील सोन्याचे दागिने बनविण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी सोन्याची लगड कारागिरास देण्यात आली होती. त्याने सुमारे ३८ लाख ४० हजार रुपयांचे दागिने विकून जुगारामध्ये पैसे उडविल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात कारागिराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शुभम वेदपाठक (रा. मंगळवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या कारागिराचे नाव आहे. संजय महादान्य (वय ४८, रा. नागणे प्लॉट) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना १५ नोव्हेंबर २०२४ ते १२ मार्च २०२५ दरम्यान घडली. फिर्यादीत म्हटले आहे, शुभम वेदपाठक सराफ दुकानात सात-आठ वर्षांपासून दागिने बनविण्याचे सुवर्ण कारागीर म्हणून काम करीत आहे. सराफ तसेच ग्राहक त्यांच्याकडील चोख सोने देवून दागिने बनवत.
१२ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शुभम दुकानात आल्यानंतर मागील एक ते दीड महिन्यात विश्वासाने दिलेले सोने (लगड) दे, ते ग्राहकास द्यायचे आहे, असे म्हटल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मला संशय निर्माण झाला ड्रॉवर त्याच्या चावीने उघडून तपासला असता सोने त्याच्याकडे मिळून आले नाही. सोन्याचे काय केले असे विचारताच सोने मोडले असून आलेले पैसे जुगारात गेले आहेत, असे त्याने सांगितले.
२४ लाख ८४ हजार २४० रुपये किमतीचे २८२ ग्रॅम ३०० मिली सोन्याची लगड, ४ लाख ४० हजार रुपयांच्या ५० ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, २ लाख ७२ हजार ८०० रुपयांचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, अंगठी, फुले, झुबे, ८३ हजार ७२ रुपयांचे ९ ग्रॅम ४४० मिली सोन्याची लगड, ४४ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे झुबे टॉप्स, ६१ हजार ६०० रुपये किमतीचे सात ग्रॅमचे टॉप्स, ३९ हजार ६०० रुपये किमतीचे ४ ग्रॅम ५०० मिली सोन्याचे झुबे टॉप्स, ३० हजार ८०० रुपये किमतीचे तीन ग्रॅम ५०० मिली सोन्याचे झुबे टॉप्स, २ लाख ८४ हजार २४० रुपये किमतीचे ३२ ग्रॅम ३०० मिली सोन्याचे गंठन, एक लाख रुपये दुकानातील रोख रक्कम, असा एकूण ३८ लाख ४० हजार ३५२ रुपयांचा ४२५ ग्रॅम ४० मिली सोने मोडून वेदपाठकने पैसे जुगारात उडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments