आजी-माजी आमदारपुत्रही आजमावणार नशीब
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. यंदाच्या लढाईत आजी-माजी आमदार पुत्रही नशीब आजमावण्याची शक्यता आहे. दोन्ही तालुक्यातील प्रमुखांकडून मतदारांशी संपर्क वाढविला आहे. सध्या, जिल्ह्यात भाजपचे आमदार सर्वाधिक आहेत. या समितीच्या कार्यक्षेत्रातील भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख हे तीनही आमदार भाजपचेच आहेत. बाकीचे सर्व प्रमुख यांच्या विरोधी गटातील आहेत. दक्षिण सोलापूरमधील मतदारांची संख्या जास्त आहे. हे जरी सत्य असले तरी ते मतदार जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, स्वामी समर्थ सुत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, कॉंग्रेसचे
माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आणि शिवानंद पाटील- कुडलकर यांच्यात विभागले आहेत. ही लढाई जिंकण्यासाठी त्यांना एकत्र येऊन सकारात्मक विचार करावा लागेल. त्यांच्यात तू-तू मैं-मै झाल्यास त्यांच्या हाती धुपाटणेच राहील. उत्तर सोलापूर तालुक्यावर माजी आ. दिलीप माने यांचा एकछत्री अंमल आहे. येथे अन्य कोणत्याही प्रमुखाला सुर गवण्यासारखी स्थिती नाही. विकास सोसायट्या व ग्रामपंचायतीतील मतदार हे माजी आ. माने जिकडे, आम्ही तिकडे असे चित्र आहे. या लढाईत कोणाशी मैत्री करायची याबाबत त्यांचे अद्याप मौन आहे. मात्र, यंदा माजी आमदार पुत्र असलेले पृथ्वीराज माने हे उमेदवार असतील अशी चर्चा युवकांमधून होत आहे. त्यांचा तरुणांशी अलीकडे संपर्क वाढला आहे. व्यापारी गटात आ. विजयकुमार देशमुख यांचे वर्चस्व आहे. त्यांनी निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. आ. कल्याणशेट्टी यांनीही निवडणूक व पॅनेल विषयी भाष्य केले नाही. तेही त्यांचे चिरंजीव शुभंकर या निवडणुकीत उतरवण्याचा अंदाज घेत आहेत. नुकतीच आ. सुभाष देशमुखांनी दक्षिणमधील भाजपच्या शिलेदारांची बैठक घेतली. त्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या विषयावर चर्चाही केली. या दरम्यान भाजपमधील मनीष ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी मनीष देशमुख यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यामुळे यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत आजी- माजी आमदार पुत्र असतील का है येणारा काळच ठरवेल.
0 Comments