लोकमंगल कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थीनी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक ६ मार्च रोजी माजी विद्यार्थीनी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या साक्षी साळी, अंकिता कांबळे व सुप्रिया महाजन ह्या माजी विद्यार्थीनी लाभल्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अंतिम वर्षातील विद्यार्थी उत्कर्ष लाड याने उपस्थित सर्वांना माजी विद्यार्थिनींचा परिचय करून दिला. सदरील माजी विद्यार्थिनींनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद मार्फत घेतल्या जाणाऱ्या निवड चाचणी परीक्षे संदर्भातील सर्व बारकावे आणि अभ्यास पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले. या समवेत कृषी क्षेत्रातील व्यवसाय प्रशासनातील पदव्युत्तर पदवीच्या तयारी साठी देखील आवश्यक असणाऱ्या विविध बाबी, पुस्तके, परीक्षांचे स्वरूप आणि विविध उपलब्ध शाखा याबाबत विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. विद्यार्थ्यानी देखील चर्चासत्राच्या माध्यमातून विविध प्रश्नांची उकल त्यांच्याकडून जाणून घेतली. याप्रसंगी प्रा. सुजाता लिगाडे यांनी सर्व माजी विद्यार्थिनींना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील मार्गदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख सौ. सुजाता लिगाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी उत्कर्ष लाड याने केले. सदरील कार्यक्रमासाठी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
0 Comments