रोटरी क्लब ऑफ सोलापूर आयोजित आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत MIT विश्वशांती गुरूकुल प्रथम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-येथील रोटरी क्लब ऑफ सोलापूर द्वारा आयोजित आंतरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी जुळे सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कुलच्या सभागृहात संपन्न झाली. अत्यंत चुरशीच्या या फेरीत एमआयटी विश्वशांती गुरूकुल शाळेच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक - एस आर चंडक इंग्लिश हायस्कुल, तृतीय - कै. वि. मो. मेहता प्रशाला आणि चतुर्थ क्रमांक आय एम एस इंटरनॅशनल स्कुलने पटकावला. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २ फेब्रुवारी रोजी मंगळवेढेकर इन्स्टिटयूट येथे आयोजित करण्यात आली होती. एकूण ५० शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला होता व त्यामधून १० संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यामध्ये वर उल्लेखिलेल्या चार संघांव्यतिरिक्त दमाणी प्रशाला, इंडियन मॉडेल स्कुल (सीबीएसई), मॉडेल पब्लिक स्कुल, लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कुल, सेंट जोसेफ हायस्कुल, संगमेश्वर पब्लिक स्कुल या शाळांची निवड झाली. सर्व संघांमध्ये अंतिमपूर्व फेरी पार पडली आणि त्यामधून आलेल्या चार सर्वोत्तम संघात तीव्र बुद्धिमतेची चुरस होऊन एमआयटी विश्वशांती गुरूकुल संघ विजेता ठरला अशी माहिती अध्यक्ष सीए सुनील माहेश्वरी यांनी दिली. सामान्य ज्ञानावर आधारित या प्रश्नमंजुषेचे सादरकर्ते (क्विझ मास्टर) डॉ. अरूण मनगोळी होते. त्यांनी सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, तंत्रज्ञान, पौराणिक कथा, खेळ, राजकारण, चालू घडामोडी इत्यादी विषयाचे अतिशय खुबीने प्रश्न विचारत, अनेक विषयांची सखोल माहिती देत ही अंतिम फेरी रंगतदार केली. बक्षीस वितरण समारंभासाठी इंडियन मॉडेल स्कुलच्या सौ. अपर्णा कुलकर्णी, नवनीत ट्रेडर्सचे मयूर शाह आणि स्माईल्स ३२ च्या डॉ. ओजस शाह उपस्थित होते. विजेत्या संघांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार, २ हजार आणि १ हजार चे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. ही स्पर्धा नवनीत ट्रेडर्स व स्मायल्स ३२ दंत चिकित्सा केंद्राद्वारा प्रायोजित करण्यात आल्याची माहिती सचिव ब्रिजकुमार गोयदानी यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे ही प्रश्नमंजुषा गेली अनेक दशके घेतली जाते. रोटरीच्या मुलभूत शिक्षण आणि साक्षरता विभागाअंतर्गत असे विविध उपक्रम क्लबतर्फे आयोजित केले जातात. तरी सोलापूरकरांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्पाच्या संयोजिका धनश्री केळकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सीए राजगोपाल मिनियार, संदीप जव्हेरी, मितेश पंचमिया, तोरल पंचमिया, संतोष कणेकर, कालिदास जाजू, सलाम शेख, सरिता आणि निलेश फोफलिया, पराग कुलकर्णी, सुहास लाहोटी, आकाश बाहेती, गोवर्धन चाटला, विद्या मणुरे, विशाल वर्मा, अश्विनी माहेश्वरी यांनी सक्रिय सहभाग दिला तसेच डॉ. राजीव प्रधान, झुबिन अमारिया, आणि जयेश पटेल या ज्येष्ठ सभासदांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments