बार्शी (कटुसत्य वृत्त):- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने बार्शी येथे मोठ्या उत्साहात समाज दिन साजरा करण्यात आला. संस्थेंतर्गत असणाऱ्या विद्यालय, महाविद्यालयांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या, रांगोळी आणि खाऊ वाटपाने स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सालाबादप्रमाणे तुळजापूर ते बार्शी आलेल्या कर्मवीर ज्योतचे स्वागत करण्यात आले. यानंतर शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरुण देबडवार यांच्यासह पोलीस बालाजी कुकडे, डॉ. गुलाबराव पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, डॉ. विलासराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या शोभायात्रेत संस्थेच्या बार्शीतील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या शोभायात्रेचा पांडे चौक येथे समारोप करण्यात आला. तत्पूर्वी अनेक ठिकाणी या शोभायात्रेचे मोठ्या उत्साहाने बार्शीकरांनी स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळी रेखण्यात आली होती, तर अनेक संस्था, व्यक्ती, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पाणी, अल्पोपहार, चहा व खाऊचे वाटप केले. या शोभायात्रेत
गरबा, लेझीम, पारंपरिक नृत्य, गीत यामुळे सर्व बार्शीकरांचे लक्ष वेधून घेतले. याचबरोबर भारतीय संविधान हातात घेऊन एकतेचा संदेश देणारे देखावे करण्यात आले होते.
नियमांचे पालन करत या शोभायात्रेत कोणत्याही प्रकारच्या डीजेचा आवाज घुमला नाही. याउलट पारंपरिक वाद्यांचा ताल नि सूर यावरच मुलांनी आपली नृत्य सादर केले.
0 Comments