बारावीच्या परीक्षा हॉलवर असणार झूम कॅमेऱ्याची नजर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग बरोबरच प्रत्येक पर्यवेक्षकाच्या खिशातील मोबाईलवर झूम मीटिंगच्या कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी दक्षता समितीची बैठक घेतली. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. 1972 पासून बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. या कालखंडानंतर पहिल्यांदाच कॉपीमुक्त अभियानासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करण्यात येत आहे असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. जिल्ह्यातील 147 संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे. परीक्षा केंद्र बाहेरून कॉफीचा पुरवठा होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या एक किलोमीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, ऑनलाइन सेवा केंद्र परिक्षा काळात बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील स्थितीचे व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. पण त्याही पुढे जाऊन प्रत्येक हॉलवरील पर्यवेक्षकांच्या मोबाईलवर झूम मीटिंगची लिंक दिली जाणार आहे. यासाठी वॉररूम स्थापन करण्यात येणार असून यातून झूम मीटिंगचा कॅमेरा सुरू करून पूर्ण हॉलवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
महसूलची पथके मदतीला…
कॉपी तपासणीसाठी जिल्हा परिषद व शिक्षण शिक्षण खात्याबरोबरच महसूलमधील तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे बैठे पथक परीक्षा केंद्रावर असणार आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.
0 Comments