आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा,
त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा- डॉ. वसंत हंकारे
मोहोळ, (कटूसत्य वृत्त):- रात्र रात्र आपला बाप आपल्यासाठी राबत असतो हे विसरू नका. आई वडीलासारखे खरे प्रेम आपल्यावर कोणीही करु शकत नाही. असे सांगत मुलींनो प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य बरबाद करु नका. १५ ते २० वर्ष आपल्याला सांभाळलेले असते त्यांच्या अन्नात प्रेम करुन माती कालवू नका, आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले.
मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे शिवमुद्रा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कोन्हेरी फेस्टिव्हल अंतर्गत "बाप समजावून घेताना " या विषयावरती प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे बोलत होते. व्याख्यानाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रा. वसंत हंकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे बालाजी शेळके, निलेश जरग, महादेव शिंदे, संदीप जरग, सोमनाथ चव्हाण, अजिंक्यराणा शेळके, शरद शेळके, विनोद शेळके, राहुल शेळके, संजय चव्हाण आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.हंकारे पुढे बोलताना म्हणाले,आपले आई- वडील समाजात ताठ मानेने फिरले पाहिजे,ही मुलगी,हा मुलगा माझा आहे असे कर्तृत्व,तुमचे वागणे,जगणे असले पाहिजे,चुकीच्या वागण्याने आपला बाप अर्धमेला होतो. त्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही असे वागू नका. कोणत्यातरी फालतू मुलाच्या नादी लागून मुलीने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये, जिवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांची मान खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. जोपर्यंत आई-बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई-बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. आई-बाप गेल्यावर कोणत्याही देवाच्या चरणी लाखो रुपये ओतले तरी तो आपले आई-वडील परत देऊ शकत नाही. त्याग समर्पणाच्या भावनेतून आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज करण्यासाठी मुला मुलींनी चांगले शिक्षण घेणे आवश्यक आहे. समाजातील वाईट गोष्टींपासून दूर रहा. अनेक प्रलोभने येथील परंतु त्या गोष्टींना दूर करून शिक्षण घ्यायच्या वयात शिक्षणच घ्या त्याशिवाय तुमचा आणि कुटुंबाचे भले होणार नाही. कोन्हेरी ग्रामस्थांनी शिवजयंतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैचारिक जागर होण्यासाठी बाप समजावून घेताना हा विषय सर्वांसमोर आणला ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचेही प्रा.हंकारे यावेळी शेवटी बोलताना म्हणाले. प्रा. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी ग्रामस्थ यांना त्यांच्या अश्रूचा बांध रोखता आला नाही. महिला व पुरुष पालक ढसा ढसा रडू लागले.
दरम्यान शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने दि. १९ फेब्रूवारी रोजी हभप मधुकर गिरी महाराज यांचे कीर्तन पार पडले, तर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०५ रक्तदात्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ७० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दि. २० फेब्रुवारी रोजी भव्य खुल्या डान्स स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत कलाकार सहभागी झाले होते. त्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यासह छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील चित्रपट मोफत दाखवण्यात आला.

0 Comments