Hot Posts

6/recent/ticker-posts

नेहरू विद्यालय १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

 नेहरू विद्यालय १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न 

करमाळा(कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील रावगाव येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद (बाबा) झिंजाडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी वाचनालयाचे प्रमुख भास्कर पवार तसेच पालक प्रतिनिधी व प्रगतशील बागायतदार भरत धगाटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.

 मार्गदर्शन करताना प्रमोद  झिंजाडे म्हणाले, ‘‘आयुष्यात नुसते जगायचे नसते तर प्रत्येक कृतीतून शिकत रहायचे असते. ज्ञानाची भूक ज्याला असेल आणि कुठलीही गोष्ट अर्ध्यातून जो सोडत नसेल, त्याला यश मिळाल्याशिवाय राहात नाही. परिक्षेचा बाऊ न करता आत्मविश्वासाने सामोरे जावे असा बहुमोल सल्ला देवून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना भास्कर पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहावे याचबरोबर शिक्षणा मधून आपल्याला जीवनामध्ये उत्कर्ष कसा साधता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आलं तर खचू नका, कोलमडू नका, पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल असे सांगितले, तर ज्येष्ठ शिक्षक किरण परदेशी सरांनी विद्यार्थ्यांना आवडेल त्या विषयात करिअर करा मात्र जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन केले, दहावीचे वर्गशिक्षक हनुमंत रासकर सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी सूचना दिल्या व उज्वल भवितव्याबद्दल शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना प्रताप बरडे सर यांनी मोबाईल टीव्ही यासारख्या माध्यमांपासून दूर राहण्यास तसेच चांगल्या मित्रांची संगत धरण्यास सांगितले तसेच नवनियुक्त शिक्षक सुहास कानगुडे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शालेय जीवनातील अनुभव, शिक्षक तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments