लोकमंगल कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर
शिक्षणाच्या संधी याविषयी व्याख्यान संपन्न
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. नागार्जुन. टी. एन. लाभले होते. सदरील व्याख्याना मध्ये तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (JRF) आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद ( MCAER) याविषयी सविस्तर माहिती सरांनी सांगितली. कृषी शिक्षण घेत असताना पदवी शिक्षणापर्यंतच न मर्यादित राहता संशोधन हा कृषी शाखेचा अविभाज्य घटक असून त्याची तयारी तृतीय वर्षापासूनच करावी असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. सदरील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असणारी पुस्तके, अभ्यासाची पद्धती, महत्त्वाचे विभाग आणि त्यांची निवड, तसेच उपलब्ध जागा इत्यादी बाबीवर त्यांनी प्रकाश टाकला. संशोधक वृत्ती वाढीस लागण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारी करता पदव्युत्तर पदवीचे शिक्षण अत्यावश्यक असून त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्यास त्यांनी सांगितले. नामांकित विद्यापीठांमध्ये, विविध शासकीय पदांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांमध्ये देखील पदव्युत्तर पदवी ही प्रमाण अट असून त्याकरिता सखोल अभ्यास करून संपूर्ण तयारीने उतरणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी देखील प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपल्या विविध शंकाचे समाधान जाणून घेतले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन व संपन्नतेसाठी प्रा. स्वाती खोबरे यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

0 Comments