लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात वृक्षारोपण अभियान आणि मृदा व जल परिक्षण जागृती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 20, 2025

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात वृक्षारोपण अभियान आणि मृदा व जल परिक्षण जागृती

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात वृक्षारोपण अभियान आणि मृदा व जल परिक्षण जागृती 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराअंतर्गत तिसऱ्या दिवशी रानमसले ता. उत्तर सोलापूर येथे ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमांतून स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. रासेयो स्वयंसेवकांनी सकाळच्या सत्रात  रानमसले ग्रामपंचायत परीसर, पोस्टऑफिस कार्यालय व हनुमान मंदिर परिसरातील विविध ठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान राबविले. दुपारच्या सत्रात रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षिरसागर, उपसरपंच रमेश सुतार, लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, प्रा. अंकिता पवार, सर्व स्वयंसेवक तसेच रानमसले ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण अभियानाची सुरुवात रानमसले येथील अंगणवाडी परीसरात आंब्याचे रोपटे लावून करण्यात आली. या अभियानांतर्गत रानमसले गावातील अंगणवाडी व मंदिर परिसर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परिसरात एकुण ३५ वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने आंबा, चिंच व चाफा या वृक्षांचा समावेश होता. संध्याकाळच्या सत्रात रासेयो शिबीराअंतर्गत रानमसले येथील ग्रामपंचायतीच्या मुख्य मंचावर "मृदा व पाणी परिक्षण महत्व" याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून प्रा. बाबाजी सिरसट ( लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा, सोलापूर ) हे लाभले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य  सागर महाजन हे लाभले होते. याप्रसंगी रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षिरसागर व उपसरपंच रमेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. अंकिता पवार, प्रा. सायली बडेकर, प्रा. आशिष सरकाळे, रोसयो स्वयंसेवक, रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  प्रा. आशिष सरकाळे यांनी उपस्थितांना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंब्याचे रोप देऊन करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे बाबाजी सिरसट यांनी मृदा व पाणी परिक्षण महत्व याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.  माती व पाणी या दोन मुख्य घटकांवर शेतीची गुणवत्ता व सुपीकता अवलंबून असते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रीय कर्ब वाढवणार्‍या उपयुक्त जीवाणूंचा र्‍हास होउन मातीचे आरोग्य व सुपीकता कमी होत चालली आहे. मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा समतोल वापर करून सेंद्रिय खतांच्या वापर वाढविला पाहिजे. माती परिक्षणामुळे आपणास जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते व त्यानुसार सेंद्रीय खतांबरोबर रासायनिक खतांचा कशाप्रकारचे व किती समतोल वापर करावा याविषयी ठरविता येते. माती बरोबरच पाणी परिक्षण करणे खुप महत्वाचे आहे. विहिरीतील व बोअरवेलमधील अतिक्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरल्यामुळे मातीतल्या क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारपट होत चालल्या आहेत. अतिक्षारयुक्त जमिनीत रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने त्यातील नत्राची क्षारांससोबत रासायनिक क्रिया होऊन मातीतले पिकांसाठी हानीकारक चुनखडीचे प्रमाण वाढते व रासायनिक खतातील नत्र पिकांना लागु न होता ते वाया जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचे परिक्षण करणे आवश्यक आहे. 
असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. याप्रसंगी रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानाचे सुञसंचालन दक्षता देशमुख यांनी व आभारप्रदर्शन मंजुनाथ कुंभार यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages