समीर गायकवाड यांच्या 'खूलूस'ला मृत्युंजय साहित्य पुरस्कार!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र कामगार संहित्य परिषद पिंपरी चिंचवड यांच्या वतीने दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षी सोलापूरचे लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस या कथासंग्रहास जाहिर झाला आहे.
गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली, पुणे येथे संपन्न होणाऱ्या ३२ व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवामध्ये सर्व पुरस्कार दिले जातील. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ हे अध्यक्षस्थान भूषवतील; तर एस. बी. पाटील स्वागतप्रमुख आहेत. संगीतकार आनंद माडगूळकर यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगावकर यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात येईल.
त्याचबरोबर कालिका बापट (गदिमा काव्यसाधना पुरस्कार), संगीता सूर्यवंशी (गदिमा लोककला पुरस्कार), राजन लाखे (गदिमा शब्दप्रतिभा पुरस्कार), अनंत राऊत (गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार), समीर गायकवाड ‘खुलूस’ या कथासंग्रहासाठी तर देवा झिंजाड यांना 'एक भाकर तीन चुली' या कादंबरीसाठी मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिला जाईल. तसेच राजेश गायकवाड (‘बिन चेहर्याच्या कविता’), आनंद पेंढारकर (‘मी एक बोन्साय’), संदीप काळे (‘सईच्या कविता’), माधुरी विधाटे (‘मल्हारधून’), मीना शिंदे (‘दीवान – ए – मीना’), निरुपमा महाजन (‘शांत गहिर्या तळाशी’) यांना कवितासंग्रहासाठी गदिमा साहित्य पुरस्कार आणि गणेश भाकरे यांना (‘थेंबा थेंबाची कहाणी’) गदिमा बालकाव्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. गदिमा दिवाळी अंक पारितोषिकासाठी अधोरेखित (प्रथम) आणि हंसा (द्वितीय) या अंकांच्या संपादिका डॉ. पल्लवी बनसोडे आणि प्रिया कालिका बापट यांना सन्मानित केले जाणार आहे.
काव्यमहोत्सवात शोभा जोशी, प्रतिमा काळे, रशीद अत्तार, देवेंद्र गावंडे आणि सुरेश वाघचौरे यांना गदिमांचे वारसदार कवी म्हणून सन्मानित केले जाईल. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या आणि नि:शुल्क असलेल्या या काव्यमहोत्सवात रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदाम भोरे आणि निमंत्रक श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी केले आहे. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष, लेखक आणि समीक्षक पुरुषोत्तम सदाफुले, तसेच सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक कवी श्री. माधव पवार यांनी गायकवाड यांच्यासह सर्व पुरस्कारजेत्या साहित्यिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. गायकवाड यांच्या 'खूलूस' या कथासंग्रहास आजवर अनेक नामवंत साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. मृत्युंजय साहित्य पुरस्काराने 'खूलूस'च्या शिरपेचात आणखी तुरा खोवला गेलाय त्यामुळे सर्व स्तरातून समीर गायकवाड यांचे अभिनंदन होतेय.
0 Comments