Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'?

 महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'?



मुंबई (कटूसत्य वृत्त):- महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचं कारण म्हणजे महायुतीमधील काही मंत्र्यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून डावलण्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली. यानंतर अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यातच उदय सामंत यांच्याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. 'एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा 'उदय' पुढे येईल' असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.

उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, 'एकनाथ शिंदे, अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न' असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला. भाजपला राज्यात एकहाती सत्ता पाहिजे असं म्हणताना त्यांनी याची सुरुवात 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून' होणार असल्याचं म्हणत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं.

भाजपच्या याच भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांनीसुद्धा स्पष्ट प्रतिक्रिया देत राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ मेळ्यात जावं असा खोचक टोला त्यांनी लगावत, एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं स्पष्ट वक्तव्य केलं. उदय सामंत यांच्या डावोस दौऱ्यावरही राऊतांनी निशाणा साधला.

काय म्हणाले राऊत?

'एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत. ही माहिती माझी... 20 आमदार जेव्हा एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते तेव्हाच हा 'उदय' होणार होता किंबहुना तेव्हाच हा 'उदय' करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वालाखाची... हे महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे', अशा शब्दांत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“मराठीमध्ये एक म्हण आहे,‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी काहीशी स्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. नाराजी दाखवून पुन्हा काहीतरी पदरात पडेल असा प्रयत्न दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी न बोललेलं बरं. त्यावर मी एखादा शब्द वापरला तर ते चुकीचं ठरेल. सध्याची महायुतीमधील स्थिती पाहता एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे स्वतःहून बाजूला व्हावेत म्हणून त्यांच्या मित्रपक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न होत आहेत का अशी भीती मला वाटत आहे. मी एक वक्तव्य करत आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं. त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन ‘उदय’ पुढे आणला जाईल. तो ‘उदय’ कुठला असेल ते मी सांगत नाही. मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल.”

उदय सामंतांनी काय स्पष्टीकरण दिलं?
खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की “शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य मी नुकतंच ऐकलं. त्यांचे वक्तव्य हा एक राजकीय बालिशपणा आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रिपद मिळाले. याची मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही.”
Reactions

Post a Comment

0 Comments