4 दिवसांचं ट्रेनिंग घेऊन झाला डॉक्टर, पंढरपुरात दहावी पास बहाद्दराने थाटला दवाखाना
3 वर्षांपासून सुरू होता रुग्णांच्या जीवाशी खेळ
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने कसलंही वैद्यकीय शिक्षण न घेता चक्क दवाखाना थाटला होता. मागील तीन वर्षांपासून हा आरोपी रुग्णांवर उपचार करत होता.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मधुमेह, हाडांच्या समस्यांसह विविध गंभीर आजारांवर उपचार करत होता. त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांकडून हजारो रुपये उकळत होता. पण संशय आल्यानंतर आरोपीचं बिंग फुटलं आहे. आरोपीनं केवळ चार दिवसांचं ट्रेनिंग घेऊन हा दवाखाना सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दत्तात्रय सदाशिव पवार असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा जालना येथील रहिवासी असून मागील तीन वर्षांपासून तो पंढरपूर आणि शेगाव याठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याचं काम करत होता. पंढरपूर शहरातील जुना अकलूज रस्ता येथील चंद्रभागा बस स्थानकामागे नारायण देव बाबा भक्तनिवास येथे आरोपीनं दवाखाना सुरू केला होता. पण परिसरातील काही लोकांना या आरोपीच्या बोगसगिरीवर संशय आला. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आरोग्य विभागाला कळवली.
दहावी पास असलेला बाबा रुग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आरोग्य विभागानं पोलीस आणि महापालिका प्रशासनाची मदत घेत आरोपीच्या दवाखान्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी दत्तात्रय पवार हा रुग्णालयात मधुमेह आणि हाडांशी संबंधित रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आहे. आरोग्य विभागानं आरोपीकडे अधिकची चौकशी केली असता दवाखाना चालवण्यासाठी आवश्यक असलेलं कसलंही वैद्यकीय सर्टीफिकेट आरोपीकडे नसल्याचं समोर आलं आहे. आरोपी केवळ दहावी पास असून त्याने दवाखाना सुरू करण्यापूर्वा सातारा इथं चार दिवसांचं ट्रेंनिंग घेतलं होतं.
याच गुणवत्तेच्या आधारावर त्याने पंढरपुरात दवाखाना थाटला होता. मागच्या तीन वर्षांपासून तो याठिकाणी रुग्णांवर उपचार करत होता. प्रत्येक रुग्णांकडून तो ५०० रुपये फी आकारत होता, दिवसाला ७० ते ८० रुग्णांवर तो उपचार करत होता. आरोपी पंढरपूरसह शेगाव याठिकाणी देखील उपचार करण्यासाठी जात होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली असून त्याचा दवाखाना बंद केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments