आई-वडिलांमुळे माझ्या लिखाणात संवेदनशीलता आली : गायकवाड
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- प्रिसिजन वाचन अभियान अंतर्गत लेखक समीर गायकवाड यांच्या 'गौहर आणि गवाक्ष'या पुस्तकाचे डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लेखक समीर गायकवाड यांची माधव देशपांडे यांनी प्रकट मुलाखत घेतली. प्रारंभी संदीप जाधव आणि आर. जे. अमृत ढगे यांनी या पुस्तकांचे अभिवाचन केले. यावेळी फाऊंडेशनच्या संचलिका स्नेहा सावे व सविता समीर गायकवाड या उपस्थित होत्या.समीर गायकवाड याप्रसंगी बोलताना म्हणाले,माझ्या आईला झालेल्या त्रासातून, तिने केलेल्या संघर्षातून माझ्या लिखाणात संवेदनशीलता आली.सोलापूरमधील तरटी नाका परिसरात मेडिकल चालवत असताना ओळख झालेल्या एका
मुलीच्या शोधातून ह्या लिखाणाचा प्रवास सुरू झाला. वेश्याव्यवसाय या विषयात खुलेपणाने
कोणी बोलत नाही, पण त्याबद्दल लिहिणं हे खूप जिकिरीचं होतं.
लिखाणाच्या निमित्ताने रेडलाईट भागात फिरत असताना अशा अनेक घटना होत्या, की
ज्याबद्दल पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी खूपवेळी मदत करून मुलींना वाचविण्यात यश आले आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक अशा ठिकाणी पोलिसांना माहिती देऊन अनेक मुलींना या सर्व व्यवसायातून बाहेर काढण्यात मदत झाली. पुस्तक लिहिण्याची प्रेरणा ही वेगवेगळ्या वाचनातून आली आहे.
चारपैकी आम्ही तीन भावंडं लेखक आहोत,त्याच्या मागची प्रेरणा ही पुस्तक वाचन आहे.झांबळ आणि गौहर या पुस्तकामुळे सामान्य माणसाला अनभिन्न असणाऱ्या विषयाचं वाचन करून अनुभवता आलं. या मुलाखती दरम्यान लेखकांचे संवाद ऐकताना अनेक रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या दिसल्या.माझा वाचन प्रवास या उपक्रमांतर्गत प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांनी त्यांचा वाचन प्रवास मांडला.
0 Comments