सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ येथे मालट्रकला लागली आग; दोन दिवसातील सलग दुसरी घटना
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- चालत्या मालट्रकच्या बॅटरी मध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत मालट्रक जळून खाक झाली. ही घटना सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ ता मोहोळ शिवारात डोंगरे वस्ती जवळ घडली.
यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे. दरम्यान रविवार ता 5 रोजी मोहोळ बस स्थानकात एका एसटी बस ने पेट घेतला होता तर सलग दुसऱ्याच दिवशी सोमवारी एका मालट्रक ने पेट घेतल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात मोहोळ पोलिसा कडून मिळालेल्या माहिती नुसार, मालट्रक क्रमांक एमएच 12/ एलटी 46 16 ही न्हावाशेवा (मुंबई) येथून प्लॅस्टिकचे दाणे घेऊन हैदराबाद कडे निघाली होती. दरम्यान मालट्रक शेटफळ शिवारात येतात बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर येत असल्याचे चालकाला जाणवले. त्याने तातडीने हालचाल करून मालट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली, त्यावेळी संपूर्ण गाडीने खालून पेट घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. दरम्यान जमा झालेल्या नागरिकांनी आग विझविण्याचा मोठा प्रयत्न केला, तर कुर्डूवाडी नगरपालिकेच्या अग्निशामक गाडीने ही आग विझविण्याचा मोठा प्रयत्न केला.
किमान सात टँकर पाणी संपले तरीही आग धुमसत होती. कारण मालट्रक मध्ये प्लॅस्टिक वस्तू असल्याने मारलेले पाणी निसरून जात होते. दरम्यान गस्ती पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांना ही घटना समजताच त्यांनी पोलीस हवालदार गणेश हंचे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू रुपनवर यांना पाचारण केले. तसेच मोडनिंब येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संतोष खडके, बंडू गायकवाड, स्वप्निल शिंदे यांनीही आग विजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
दरम्यान डोंगरे वस्ती जवळच असणारे सागर सुरवसे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी आणून विश्वास वाघमारे, संभाजी चव्हाण या शेतकऱ्यांनी पाईप टाकून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.त्यामुळे आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास अंमलदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.
0 Comments