लोकमंगल कृषी व संलग्नित महाविद्यालया मध्ये हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित, लोकमंगल कृषी व संलग्नित महाविद्यालया द्वारे दिनांक १७ जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ लोकमंगल शैक्षणिक संकुलामधील श्रीराम मंदिर येथे आयोजित केला होता. या समारंभासाठी लोकमंगल शैक्षणिक संकुलातील सर्वच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालक माता,भगिनी तसेच पंचक्रोशीतील विविध गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, उळे ,तामलवाडी ,बार्शी, शेळगाव, मोहोळ ,बाळे येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समारंभाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापिका यांनी हळदीकुंकवासाठी आलेल्या सर्व महिलांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दिव्य मराठीच्या पत्रकार मा. सौ.अश्विनी तडवळकर तर अध्यक्षपदी संस्थेच्या सचिव डॉ. अनिता ढोबळे या उपस्थित होत्या. यावेळी लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख प्रा. सुजाता चौगुले यांनी समारंभाची औपचारिक प्रास्ताविका सादर केली. कृषिविद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रा. नम्रता मोरे यांनी प्रमुख अतिथी सौ. अश्विनी तडवळकर यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. यानंतर मा. अश्विनी तडवळकर यांनी महिलांना स्वावलंबी व विविध घरगुती उद्योगांबाबत मार्गदर्शन केले. संस्कृती जपण्यासाठी लोकमंगल शैक्षणिक समुह राबवित असलेल्या यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. यानंतर अध्यक्षीय मनोगता मध्ये डॉ. अनिता ढोबळे यांनी महिलांना कुटुंबांची जबाबदारी पार पाडताना स्वतःसाठी देखील सुंदर आयुष्य कसं जगावं याविषयी प्रोत्साहित केले. सदरील उपक्रमाला सर्व महिलांचा भगिनींचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू व वाण देण्यात आले. यावेळी महिलांकरिता करमणुकीच्या विविध स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते .यात प्रामुख्याने संगीत खुर्ची आणि उखाणे यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामधील विजयी महिलांना सन्माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथी द्वारे पारितोषिक वितरण करण्यात आले. यानंतर उपस्थित महिलांनी कार्यक्रमाप्रसंगी असलेले आपले मनोभाव व्यक्त केले आणि समारंभ आयोजना बद्दल लोकमंगल शैक्षणिक संकुलाचे आभार व्यक्त केले. मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हळदीकुंकू समारंभ सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. स्वाती खोबरे यांनी सर्व उपस्थित महिलांचे व प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. नम्रता गोरे, प्रा. कल्पना मिटकरी, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. तेजश्री लच्यान, प्रा .सरस्वती कांबळे व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments