लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरा अंतर्गत महिलांना मिळाले लघुउद्योग व महिला सबलीकरणाचे धडे
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 18 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत मौजे भाळवणी ता. मंगळवेढा जि सोलापूर या ठिकाणी करण्यात आले आहे.शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या ,सुप्रसिद्ध प्रशिक्षका व संस्थापक बी .वी . प्रशिक्षण केंद्र आणि सल्लागार सेवा यशदा संस्था पुणे च्या सौ. भाग्यश्री वठारे यांचे लघुउद्योग आणि महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सौ.भाग्यश्री वठारे ह्या नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार (राजस्थान) म्हणून सध्या कार्यरत आहेत . त्यांनी आजवर अनेक महिलांना लघुउद्योग व आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. सदरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या सौ. भाग्यश्री वठारे व कार्यक्रमाध्यक्ष भाळवणी गावचे सरपंच मा. श्री लक्ष्मण गायकवाड आणि उपसरपंच मा .सौ. सुजाता लिगाडे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. व्याख्यानामध्ये उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना आणि भाळवणी गावातील महिला भगिनी तसेच ग्रामस्थांना त्यांनी प्रामुख्याने विविध शासकीय योजनांद्वारे लघुउद्योग उभे करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवश्यक बाबी याबाबत मार्गदर्शन केले . लघुउद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी आहेत आणि त्या त्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातूनच तयार केल्या पाहिजेत अशी प्रकट इच्छा त्यांनी व्यक्त केली. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास करण्यासाठी यशदा संस्था आणि ग्रामपंचायत कार्यालय भाळवणी याद्वारे सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन दिले. या व्याख्यानासाठी गावातील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. महिला भगिनींनी लघुउद्योग सुरू करण्याविषयीच्या त्यांच्या मनातील शंका उपस्थित केल्या आणि त्यांची उकल जाणून घेतली तसेच बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग उभारण्याची तयारी सुद्धा दाखवली. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग चौगुले, माजी संचालक संत दामाजी सहकारी साखर कारखाना यांनी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले. मेहबूब सुतार यांनी भाळवणी गावच्या ग्रामसेविका तथा लोक मंगल कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु .सानिया तांबोळी यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले यातूनच सर्व महिला भगिनींनी बोध घ्यावा असे आवाहन देखील केले. भाळवणी गावचे सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लघुउद्योग उभारणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची हमी दिली. उपसरपंच सुजाता लिगाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे महिलांच्या सबलीकरणासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात महिलांनी आपला सहभाग वाढवावा याकरिता आवाहन केले. ग्रामसेविका कु.सानिया तांबोळी यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी स्वतः नेहमीच प्रयत्नशील व तत्पर राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रमाधिकारी अजित कुरे यांनी केले. लोकमंगल शैक्षणिक समूह व कृषी महाविद्यालय भाळवणी गावातील महिला भगिनींसाठी कृषी संलग्नित लघुउद्योग सुरू करण्यासाठी भविष्यात नक्कीच प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करेल आणि गावाच्या महिला सबलीकरणात आपले योगदान देण्यास उत्सुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्तुत्य सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका गायत्री जाधव हिने केले. सदरील व्याख्यानाच्या यशस्वी आयोजन व संपन्नतेसाठी भाळवणी गावचे प्रतिष्ठित नागरिक सारंग लिगाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरील कार्यक्रमास भाळवणी गावच्या महिला भगिनी, आशा सेविका सौ. सुनिता निकम , अंगणवाडी सेविका, व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
0 Comments