बार्शीच्या पाणीपुरवठा योजनेचे ४० कि.मी.पर्यंतचे काम पूर्ण
बार्शी, (कटुसत्य वृत्त):-
उजनी ते बार्शी या २९६ कोटी रुपयांच्या स्वतंत्र नूतन पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने सुरू असून ७२ पैकी ४० किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या मे पर्यंत काम मार्गी लागेल, अशी माहिती जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी 'संचार'शी बोलताना दिली.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती असली तरी शेतीमुळे अडथळे येत आहेत. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून यसंबंधीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसानभरपाईचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर उर्वरित जलवाहिनी टाकण्याचे काम पुढे सरकणार आहे. यामुळे बार्शी मेपर्यंत योजना पूर्णत्वाकडे जाणार या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. जलवाहिनीच्या सततच्या गळतीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पार्श्वभूमीवर बार्शी नगरपालिकेने कायमचा तोडगा काढत उजनी ते बार्शी ही २९६ कोटी रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनस्तरावर वेगाने पाठपुरावा केला होता.
आतापर्यंत बार्शी ते कुर्डुवाडी व पुढे एमआयडीसीपर्यंत ४० किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे नगरपालिका जलदाय अभियंता होनखांबे यांनी सांगितले. दरम्यान, आजपर्यंत बार्शी शहराला गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणातूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.मात्र, जलवाहिनीच्या सततच्या गळतीमुळे तसेच तांत्रिक बाबींमुळे अनेकदा बार्शीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नव्या योजनेमुळे
शहराला रोज साडे चार कोटी लीटर पाण्याची उपलब्धत होणार आहे.
जलवाहिनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होती. यानुसार तसे प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून येत्या मे महिन्यापर्यंत जनीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे, असेही होनखांबे यांनी सांगितले. नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनीही या योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
0 Comments