दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या केंद्रांमध्ये वाढ! २४ जानेवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक,
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा आता काही दिवसांवर असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचे दोन परीक्षा केंद्रे वाढली असून जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर त्यांची परीक्षा होईल. तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची तीन केंद्रे वाढली असून जिल्ह्यात बारावीसाठी १२४ केंद्रे असणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता बारावीचे जवळपास ५८ हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीतील ६३ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांची १२४ केंद्रांवर आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची १८४ केंद्रांवर परीक्षा होईल. सध्या केंद्र संचालकांची यादी अद्ययावत केली जात आहे. दोन्ही परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे, पण ज्या केंद्राजवळ दुसरे केंद्र नाही, अशा केंद्रांसाठी ही पद्धत लागू नाही. दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशानुसार बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी केली. त्यावेळी बहुतेक परीक्षा केंद्रांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
अनेक संस्थांनी निधीचे कारण पुढे केल्याने अधिकाऱ्यांचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. तरीपण, त्यांनी शासनाच्या २१ ऑगस्ट २०२४च्या निर्णयाकडे बोट दाखवून त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन २१ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कॅमेरे बंधनकारक आहेत. याशिवाय यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी बारावीचे तीन तर दहावीचे दोन केंद्रे वाढली आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन असणार आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
परीक्षांचे वेळापत्रक असे...
इयत्ता दहावी : प्रात्यक्षिक- ३ ते २० फेब्रुवारी २०२५ आणि लेखी- २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत
इयत्ता बारावी : प्रात्यक्षिक- २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ आणि लेखी- ११ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत
0 Comments