Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द

 सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द



नव्याने प्रारुप मतदार यादी करण्याचा पणन विभागाचा आदेश

सोलापूर, (कटुसत्य वृत्त) :- 
संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतरही गरज नसताना दोनदा मुदतवाढ आणि निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्दबातल करून १ जानेवारी २०२५ पासून नव्याने मतदार यादी तयार करण्याचा आदेश राज्यातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या अगोदर निवडणूक प्राधिकरणाने सोलापूर, बार्शीसह राज्यातील एकूण तेरा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली होती. मतदार यादी व त्यावरील दावे हरकतीही पूर्ण करण्यात आल्या होत्या. अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. उमेदवारी अर्जांची विक्री व अर्ज स्वीकृती सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर थांबविण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. सरकार स्थिरावल्याने आता बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार या अपेक्षेने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, आता पुन्हा नव्याने प्रारुप मतदार यादी केल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राविण्याचे आदेश ३१ डिसेंबर रोजी पणन विभागाने दिल्याने इच्छुकांच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे..
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी १ जून २०२४ अखेरच्या दिनांकास धरून
केलेली असल्याने, सदर मतदार यादीस २ डिसेंबर २०२४ रोजी ६ महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा १ जानेवारी २०२५ पासून आहे त्या टप्प्यावर सुरू होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्याने प्रारुप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे या आदेशात सूचित करण्यात आले आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीसाठी सहा महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन मतदार यादी केली जाते. जुन्या मतदार यादीतील मतदारांची नावे तपासली जातात. त्यानंतर सदरची नवीन प्रारूप मतदार यादी तयार केली जाते. कायद्याच्या नियमानुसार प्रारूप मतदार यादीस सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याने, मतदार यादी बनवण्याचे कामकाज सुरू करण्याचे आदेश पणन विभागाने दिल्याचे पणन उपसंचालक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांनी सांगितले.

१३ पैकी सोलापूरला वेगळा आदेश का ?
सोलापूर, बार्शीसह राज्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया एकाचवेळी सुरू झाली होती. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होऊन उमेदवारी अर्जांची विक्री व स्वीकृती सुरू असताना विधानसभा निवडणुकीसाठी बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर थांबविण्याचा आदेश राज्य निवडणूक प्राधिकरणाने दिला होता. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पणन विभागाने केवळ सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरवून नव्याने प्रारूप मतदार यादी बनविण्याचा आदेश दिला आहे. बार्शी आणि राज्यातील अन्य बाजार समित्यांबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. सोलापूर बाजार समितीसाठीच वेगळा आदेश काढण्यामागे 'अर्थ'कारण दडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
न्यायालयात दाद मागणार
एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती रद्द करता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाने सुरू केलेली निवडणूक प्रक्रिया
रद्दबातल ठरविण्याचा अधिकार पणन विभागाला नसताना पणन उपसचिव संतोष देशमुख व बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांनी अधिकाराचा दुरूपयोग करून मतदार यादी
नव्याने करण्याचा घाट घातला आहे. त्यांचा निर्णय रद्दबातल ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बाजार समितीचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी सांगितले. विरोधकांवर सूड उगविण्याचा भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असून त्याला न्यायालयात आव्हान देऊन उत्तर देऊ असे हसापुरे म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments