तीन वर्षे पाणीपट्टी न भरल्यास सात-बारावर बोजा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागील काही वर्षांपासून सिंचन प्रकल्पातील पाणी वापरल्यानंतरही त्याची पाणीपट्टी वसुली होत नव्हती. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
आता तीन वर्षे पाणीपट्टी न भरल्यास संबधित सात-बारा उतार्यावर बोजा चढविण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.प्रलंबित सिंचन पाणीपट्टीसाठी संबंधीत कार्यकारी अभियंता जमीन महसुली वसुली अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे महसुली वसुली प्रमाणपत्र काढल्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत सातबारा उतार्यावर बोजा चढविला जाणार आहे. दरम्यान, पाणीपट्टी वसुलीसाठी विभाग स्तरावर दरवर्षी 15 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने अधिकार्यांना दिल्या आहेत. आता वसुलीला गती येणार आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये जलसंपदा विभागाची पाणीपट्टी मोजणी, आकारणी व वसुलीबाबत पारदर्शक पर्याय, मार्गदर्शक तत्त्वे व उपाययोजना करून पाणीपट्टी वसुली वाढावी याबाबत विविध पर्याय, उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पाणीपट्टी थकबाकी वसुली होण्यासाठी पाणी वापर संस्थांनी केलेल्या वसुलीच्या 50 टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून पाणी वापर संस्थांना दिली जाणार आहे. त्यातून पाणी वापर संस्था आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होतील. पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वसुली समिती असेल.
0 Comments