लोकमंगल कॉलेजेस मध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कॉलेजेस वडाळा येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक माननीय आमदार सुभाष बापू देशमुख हे लाभले होते. या जागतिक ध्यान दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध योग अभ्यासक प्रा. स्नेहल पेंडसे ह्या लाभल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी, संस्थेच्या सचिवा व लोकमंगल शैक्षणिक संकुलातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने प्रास्ताविक मांडताना लोकमंगल कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांनी ध्यान दिवस साजरा करण्यामागची संकल्पना, त्याचा इतिहास आणि दैनंदिन जीवनातील ध्यानाचे महत्त्व याबाबत आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख अतिथी प्रा. स्नेहल पेंडसे यांचा परिचय सर्व उपस्थितांना लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सागर महाजन यांनी करून दिला. प्रा. स्नेहल पेंडसे ह्या सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र योगासने खेळ असोसिएशन च्या सदस्या असून मागील तीस वर्षापासून त्या योग अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. सद्यस्थितीत त्या योग पदविका या अभ्यासक्रमा अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे योग अभ्यासक म्हणून ज्ञानदानाचे व योगप्रसारकाचे काम करीत आहेत. सुप्रसिद्ध योग अभ्यासकाचा यथोचित सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. पेंडसे मॅडम यांनी विद्यार्थी दशेत आणि दैनंदिन जीवनात ध्यानाचे असलेले महत्त्व विशद केले. सत्य,अहिंसा,अपरिग्रह, ब्रह्मचर्य, ध्यान व साधना इत्यादी विविध बाबी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय स्तुत पद्धतीने समजून सांगितल्या. भारतीय संस्कृती लाभलेला हजारो वर्षांपूर्वीचा योग आणि ध्यान याचा इतिहास त्यांनी यावेळी उलगडून दाखवला. त्यानंतर सर्व सन्माननीय मान्यवर तथा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ध्यानाच्या प्रात्यक्षिकामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानंतर लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी जागतिक ध्यान दिनानिमित्त लोकमंगल समूहात विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या पायाभरणी करता घेण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमा बाबत सर्वांना माहिती दिली. या जागतिक ध्यान दिनामध्ये सहभागी होऊन आत्मिक तसेच वैचारिक आनंद मिळाल्याची भावना विद्यार्थी मनोगता मध्ये लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी गणेश केदार आणि कु. मीनल कस्तुरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये श्री. सुभाष बापू देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी तरुण वयात मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सुदृढ राहण्यासाठी योग अभ्यास, ध्यानधारणा इत्यादींचा अवलंब दैनंदिन दिनचर्येत करावा असा मौलिक सल्ला दिला. शरीर हीच खरी संपत्ती असून ती जपण्यासाठी सर्वोत्परी ध्यानाचा अवलंब करून आत्मिक समाधान व शांतता प्राप्त करावी ही सदिच्छा देखील व्यक्त केली. प्रा. पेंडसे मॅडम यांनी या योग क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभल्याबद्दल लोकमंगल समूहाच्या वतीने त्यांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केले आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून लोकमंगल शैक्षणिक समूह योग अभ्यास ध्यानधारणा याबाबत नक्कीच पुढाकार घेईल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचा शेवट हा लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सदरील जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यासाठी संस्थेच्या सचिवा डॉ. अनिता ढोबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रा. कविता संभारम यांनी केले. हा दिवस यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी लोकमंगल शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अतुलनीय सहकार्य लाभले.
0 Comments