सिध्देश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
२५० हुन अधिक श्वानांचा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोमध्ये देशी- विदेशी २५० हून अधिक श्वान सहभागी झाले होते. या शोला सोलापुरातील श्वानप्रेमींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
होम मैदान येथे श्री सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने तसेच कृषी विभाग आत्मा, सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सहयोगाने २१ ते २५ डिसेंबरदरम्यान आयोजित यंदाच्या ५४ व्या भव्य श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनात रविवारी दुसऱ्या दिवशी डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी या डॉग शोचे उदघाटन पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर व
त्यांच्या पत्नी कविता देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी प्रदर्शनाचे प्रमुख
गुरुराज माळगे, देवस्थानचे विश्वस्त प्रभुलिंग मैंदर्गीकर, पशुपती माशाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉग शोसह फॅन्सी व फॅशन डॉग शोही घेण्यात आला. यामध्ये सहभागी होण्यासाठी श्वानमालक आपल्या श्वानासह आले होते. यातील काहींच्या श्वानांना रंगीबेरंगी टी- शर्ट व हूडी, फ्रॉक आदी घालून छानपैकी नटविण्यात आले होते तर काही श्वानांना निसर्गतःच सौंदर्य लाभले होते. त्यामुळे हा शो पाहून आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याची भावना सोलापूरसह विविध ठिकाणाहून आलेल्या श्वानप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, यातील विजेत्या श्वानांचा त्यांच्या मालकासह सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन संयोजकांच्यावतीने गौरव करण्यात आला. हा बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरूराज माळगे, श्री सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश बिराजदार, रतन रिक्के तसेच सुप्रिता चाकोते, शीतल काडादी, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा गुंगे, सांगलीच्या स्मार्ट एक्स्पोचे प्रमुख सोमनाथ शेटे, संचालिका रेखा शेटे, प्रा. डॉ. संतोष मेटकरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या शोचे परीक्षक म्हणून सांगलीचे महेश माने यांनी काम पाहिले. यासाठी केनाल असोसिएशन ऑफ सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष महेश दळवी, आर्यन दळवी, स्वप्ना दळवी, शलवरी श्राफ, रसिका बडवे व त्यांच्या संपूर्ण टीमचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. यावेळी कार्निवल कंपनीकडून शोमध्ये सहभागी श्वानांना फूड पॅकेट मोफत देण्यात आले.
ऑल ब्रीड डॉग शोतील विजेत्यांचा गौरव यामध्ये लॅब्राडॉर, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, बिगल, बिशान, कारवान, रॉटवेलर यासह देशी-विदेशी पंचवीस प्रकारचे अडीचशेहून अधिक श्वान या डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. यातील ऑल ब्रीड डॉग शोतील प्रत्येक गटातून आठ विजेत्या
श्वानांचा त्यांच्या मालकांसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच लहान मुलांसाठीही बेस्ट डॉग हॅण्डलर स्पर्धा घेऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.
0 Comments