Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा

लोकमंगल कृषी महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा



राहुरी   (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शिवार फेरी, प्रश्नमंजुषा आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. लोकमंगल शैक्षणिक संकुलाच्या नजीकच्या १५ गावात या शिवार फेरीचे आयोजन जागतिक मृदा दिनानिमित्त करण्यात आले. यात मार्गदर्शक विषय तज्ञ आणि विद्यार्थी यामार्फत माती पाणी तपासणी, मातीचे आरोग्य आणि संवर्धन याचा जागर चलचित्रफितीच्या आणि  संवादाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बांधावर  करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी जागतिक मृदा दिनाची संकल्पना, यावर्षीची थीम आणि कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकात मांडली. यानंतर कृषी शिक्षणात असलेले मातीचे महत्त्व महाविद्यालयातील प्रत्येक विभागातील सहाय्यक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या व्याख्यानाच्या स्वरूपातून मांडले. यामध्ये प्रा. किरण माळी, प्रा. मीनाक्षी नाईकनवरे, प्रा. ज्ञानसागर सुतार, प्रा. कल्पना मिटकरी, प्रा. शुभांगी काळे, प्रा. स्वाती खोबरे आणि प्रा. अजित कुरे यांनी आपापल्या संलग्नित विभागात माती ही किती महत्त्वपूर्ण आहे याची विविध उदाहरणासह आणि शास्त्रीय पद्धतीने माहिती विशद केली. मातीचा ऱ्हास थांबवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या मूलभूत गोष्टीवर सर्व सजीव घटकाचे जीवनमान अवलंबून असल्याने जैवविविधता टिकवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. यानंतर अध्यक्षीय मनोगता मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी कृषी पदवीधरा साठी मृदेचे असलेले अतूट नाते वैज्ञानिक तथा सामाजिक बाबीवर भाष्य करून सांगितले. विद्यार्थ्यांनी मृदा संवर्धनासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या स्वतःच्या शेतात नक्की करावा असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाचा शेवट हा प्रा. अजित कुरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. यानंतर उपस्थित सर्व प्रथम व अंतिम वर्षातील विद्यार्थ्याकरिता जागतिक मृदा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सदरील कार्यक्रमास प्रा. सुजाता चौगुले, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. अजिंक्य ढोरे आणि प्रा. प्रकाश गुरव यांची विशेष उपस्थिती होती. 

 

Reactions

Post a Comment

0 Comments