सीना-माढा उपसासिंचन भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी- रणजितसिंह शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणावरून कार्यान्वित केलेल्या सीना-माढा उपसासिंचन योजनेच्या कामांकरिता ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले आहे.त्यांना शासन व कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील निधीचे शेतकऱ्यांना त्वरित वितरण करावे अशी मागणी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,उजनी धरणातून सीना-माढा उपसासिंचन योजना राबविण्यात आली आहे.या योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे परंतु अद्यापही काही गावातील काम अर्धवट आहे.हे काम पूर्ण होण्यासाठी संबंधित गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे शासनाने संपादन केले आहे परंतु संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम अद्याप मिळालेली नाही तेव्हा त्यांना ही रक्कम त्वरित मिळावी याकरिता माजी आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मंजुरीचे व वितरणाचे काम थांबले होते परंतु सध्या आचारसंहिता संपलेली आहे.तेंव्हा शासन व कृष्णा खोरे विकास महामंडळाने संबंधित पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केली आहे.
-चौकट-
सीना-माढा उपसासिंचन योजनेच्या कामासाठी अनेक गावांतील ब-याच शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन शासन व कृष्णा खोरे विकास महामंडळाने केलेले आहे.या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे नुकसान भरपाई नक्कीच मिळणार आहे.आम्ही आमच्या विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळ व शासनाकडे सुमारे 25 कोटी रकमेची मागणी केली आहे.ही रक्कम शासनाकडून मिळणार आहे.ती रक्कम आमच्या कार्यालयाकडे मिळताच संबंधित पात्र शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम तातडीने वितरित करण्यात येईल अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली आहे.
0 Comments