शैक्षणिक सहलीसाठी एसटीचे दर निम्मे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिवाळी सुट्यांनंतर आता शाळा सुरू झाल्याने सहलीचे नियोजन केले जात आहे. यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) निम्मे भाडे आकारणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कमी पैशात जास्त प्रवास करून अधिक पर्यटनस्थळांना भेटी देता येणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांकडून एसटी बस नोंदणी (बुकिंग) सुरू झाली आहे. एक डिसेंबरपासून रोज चार - पाच सहली जात आहेत. आता ११ डिसेंबरपासून सहलींचे प्रमाण वाढण्याची शक्यता महामंडळाकडून व्यक्त करण्यात आली.
सध्या सर्व शाळांकडून अभ्यास सहलीचे आयोजन केले जात आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सहलीसाठी एसटी बसमधूनच विद्यार्थ्यांना नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शाळांकडून एसटी बस नोंदणी केली जात आहे. ४३ आसन क्षमतेच्या गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर ५५ रुपये दर आहे. महामंडळांकडून विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी प्रतिकिलोमीट २७.५ रुपये भाडे आकारले जात आहे. तसेच सोलापूरसह जिल्ह्यातील दहा आगारातून मागणीनुसार बस उपलब्ध करून दिले जात आहेत.
शाळांकडून जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर या पर्यटन स्थळांसह महाबळेश्वर व रायगड, मुरुड, जंजिरा आदी कोकणातील प्रेक्षणीय स्थळांना प्राधान्य दिले जात आहे. सहलीत गडकिल्ले, धार्मिक स्थळांचा समावेश आहे. शालेय शिक्षणासह विद्यार्थ्यांना भौगोलिक स्थितीचाही अभ्यास करता यावा, त्यांना ऐतिहासिक, धार्मिक स्थळांची पाहणी करता यावी, माहिती मिळावी, यासाठी विविध स्थळांना भेटी देण्याचे व निसर्ग सहलीचे आयोजन केले जात आहे. शिवाय लहान मुलांना आनंद लुटता यावा, यासाठी वॉटर पार्कच्याही सहली आयोजिल्या जात आहेत.
अभ्यासासह पर्यटन वाढीस चालना शैक्षणिक सहली विविध ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, वस्तुसंग्रहालये, विज्ञान केंद्र, शैक्षणिक व औद्योगिक संकुल, कारखाने या ठिकाणी नेल्या जातात. या स्थळांबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. शिवाय पुस्तकात वाचलेले, छायाचित्रात पाहिलेले स्थळ प्रत्यक्ष पाहताना वेगळा आनंद असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या माहिती मिळविण्यासह जिल्हा, राज्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या ठरतात. त्यात वृद्धीही होते.
शैक्षणिक सहलीसाठी भाड्यात ५० टक्के सवलत दिली जात आहे. गतवर्षी शैक्षणिक सहलीसाठी २०० गाड्यांची नोंदणी झाली होती. यंदाही गेल्या दहा दिवसांत रोज चार - पाच सहली जात आहेत. शाळा कोकणातील पर्यटनस्थळांना प्राधान्य देत आहेत. १५ डिसेंबरनंतर सहलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- उत्तम जोंधळे, आगार व्यवस्थापक, सोलापूर
शाळांनी घ्यावयाची काळजी समुद्र किनारी, उंच पर्वत, तलाव आदी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होईल अशा ठिकाणी सहलीचे आयोजन करू नये.विद्यार्थ्यांच्या पालकांना सहलीच्या नियोजनाची माहिती द्यावी.विद्यार्थ्यांना सहलीच्या ठिकाणच्या भौगोलिक वातावरणानुसार घ्यावयाची काळजी, प्रथमोपचाराविषयी मार्गदर्शन करावे,विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास सोबत शिक्षिका असाव्यात,दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा,विद्यार्थ्यांना एकटे दुकटे, नजरेआड सोडू नये,रात्रीचा प्रवास टाळावा,सहलीसाठी हवीत ही कागदपत्रे,मुख्याध्यापकांचे पत्र,शाळा समितीचा ठराव,सहलीसाठी सरकारचा आदेश,गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचे पत्र,विद्यार्थी व पालक संमतिपत्र,सहभागी विद्यार्थी, शिक्षकांची यादी,सहल नियोजन व ठिकाणांचा नकाशा,प्रथमोपचार पेटी सोबत असल्याचे पत्र.
0 Comments