Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळचे नवे नगराध्यक्ष नक्की कोण ठरवणार ?

 मोहोळचे नवे नगराध्यक्ष नक्की कोण ठरवणार ?

विद्यमान आमदारांबरोबर माजी आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला 
सत्तेच्या गडापेक्षा नगराध्यक्षपदाच्या सिंहासाठीच चढाओढ



मोहोळ (साहिल शेख):- सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि राजकीय दृष्ट्या सातत्याने चर्चेत असलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या स्थापना झाल्यापासूनच्या दुसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय वातावरण निर्मितीला प्रारंभ झाला आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झालेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अंतर्गत प्रभाग निहाय आरक्षण सोडत देखील नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचारालाच प्रारंभ झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. गत निवडणुकीच्या निकालामध्ये अत्यंत संमिश्र कौल आल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा धाडसाने कोणत्या पक्षाला करता आला नाही. राष्ट्रवादीने चार जागा, शिवसेनेने सर्वाधिक सहा जागा काँग्रेस पक्षाने दोन जागा तर रमेश बारसकर यांच्या आघाडीने तीन जागा मिळवल्या होत्या.

आता निवडणूक होऊन तब्बल नऊ वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत मोहोळ शहराच्या राजकीय पुलाखालून बरेच नाट्यमय घडामोडीचे पाणी वाहून गेले आहे. मोहोळ विधानसभा सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कागदोपत्री ताब्यात आहे. मात्र विद्यमान आमदार राजू खरे हे शिंदे सेनेच्या सातत्याने संपर्कात असल्यामुळे आ.राजू खरे या नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या माध्यमातून निवडणुकीत ताकद लावणार की शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून ताकद लावणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. मोहोळचे माजी आमदार तथा मोहोळ तालुक्याच्या विकासात्मक आणि राजकीय घडामोडीच्या केंद्रस्थानी असलेल्या राजन पाटील यांची भूमिका सध्या अत्यंत महत्त्वाची  आहे. कारण राजन पाटील हे राष्ट्रवादी अजित दादा पवार यांच्या पक्षासोबत असल्यामुळे ते महायुती मध्ये समावेशित असलेले नेतृत्व आहेत. शिवाय ते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष असल्याने राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे काम पाहत आहेत. त्यामुळे ते स्वबळावर मोहोळ शहरात पॅनलची निर्मिती करून निवडणूक लढवणार की महायुती म्हणून भाजप आणि शिंदे सेनेला सोबत घेऊन निवडणूक लढणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र तालुक्यातील शिंदे सेना त्यांना सातत्याने पाण्यात पाहत असल्यामुळे ते राजन पाटील यांच्या समविचारी आघाडी सोबत जातील की नाही याबाबत जरा शंकाच आहे.मात्र आजवरचा राजन पाटील यांचा अनुभव पाहता ते एकला चलोरे च्या भूमिकेत असल्यामुळे ते समविचारी पक्षप्रवाहातील व्यक्तींना सोबत घेऊन ही निवडणूक लढवून शकतात. चार दोन जागा कमी आल्या तरी चालेल मात्र मोहोळ सारख्या मोक्याच्या आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद खेचून घेण्यासाठी ते आपला नेहमीचा सोशल इंजिनिअरिंगचा डाव टाकू शकतात. ज्या ज्या वेळेस मोहोळचे सर्वोच्च पद हे खुल्या प्रवर्गासाठी असते त्यावेळेस शिवसेना विजयी होते हा आजवरचा इतिहास आहे. मात्र ज्या ज्या वेळेस मोहोळचे पद हे सर्वसाधारण वगळता इतर सर्व प्रवर्गासाठी असते, तेव्हा मतांची आणि निकालानंतर जागांची गोळा बेरीज करत राजन पाटील स्वतःच्या नेतृत्वाचा झेंडा मोहोळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवतात हा देखील इतिहास सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे मोहोळ नगर परिषदेची ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाचा कस पणाला लावणारी ठरणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोहोळ शहराने महायुती ऐवजी महाविकास आघाडीला भरभरून मतांचे दान दिले आहे. आता या मतदानाच्या बदल्यात लोकसभेच्या खासदार आणि विधानसभेच्या आमदारांनी गेल्या वर्षभरात मोहोळला काय दिलं याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. साहजिकच दोन्ही निवडणुकाला मोहोळमधून मोठे मताधिक्य मिळाल्यामुळे याच महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्यासाठी चढाओढ लागणे गरजेचे होते. मात्र आता तशीच चढाओढ महायुती म्हणजे राजन पाटील आणि भाजपा आघाडीकडून देखील उमेदवारी मिळवण्यासाठी पडद्याआड सुरू झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राजन पाटील यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास चारशे कोटी रुपयांचा निधी माजी आमदार यशवंत माने यांच्या समवेत प्रयत्न करून आणला आहे. याचे श्रेय केवळ आणि केवळ माजी आमदार राजन पाटील यांना जाते. कारण त्यांनीच वित्तमंत्री ना.अजितदादा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडे अविरत पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी निधी आणला. त्यामुळेच शहराचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलला हे कोणीही नाकारणार नाही. मात्र त्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मोहोळ शहरातील सर्वच नगरसेवकांनी पक्ष भेद गट तट विसरून स्वतःचे प्रापंचिक प्रश्न सोडवण्यासाठी जी धडपड केली ते देखील शहराने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे बऱ्याच नगरसेवकांना विकासकामे किती केली हे दाखवण्यापेक्षा ती कमी कोणत्या दर्जाने आणि कशा स्वरूपात केली हे देखील समोर आणणे गरजेचे आहे. मोहोळ शहरात काही नगरसेवक असे आहेत की त्यांनी आपल्या प्रभागातील जनसंपर्क कधीही कमी होऊ दिला नाही चार दोन कामे कमी केली मात्र सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांनी घेतलेली भूमिका त्यांना राजकीय क्षेत्रात कायम ठेवणार आहे.

विद्यमान आमदार राजू खरे यांच्या गटप्रवाहात अजून म्हणावी तशी तयारी दिसून येत नाही. महाविकास आघाडीला आणि त्यामधील ढीगभर रथी महारथींना गेल्या वर्षभरात मोहोळ शहरात साध्या टोपलंभर मुरमाचा देखील नारळ फोडता आला नाही. नुसताच फेसबुकवर कौतुकाचा पोकळ फेस आणि व्हाट्सअप वर शुभेच्छांच्या आभासी वर्षावात हा पक्ष मश्गुल आहे.आ. राजू खरे हे विधानसभेला विजयी झाल्यानंतर त्यांना मोहोळ शहरात आपला फारसा विकासकामांचा करिष्मा आजतागायत दाखवता आला नाही. कारण निवडणूक होऊन एक वर्षाचा कालावधी झाला तरीही त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या इतर सर्वपक्षीय नेत्यांना मोहोळसाठी भरीव निधीच काय मात्र शिवाजी चौक ते गवत्या मारुती चौक या मार्गावरील खड्डे देखील बुजवता न आल्यामुळे मोहोळ शहरात यापुढे विकासाचे राजकारण नक्की कधी सुरू होणार हे नाव उलगडणारे कोडे आहे ?

मोहोळच्या विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये जवळपास सर्वच पक्षांच्या बाबतीत पुन्हा तोच एक मुद्दा अधोरेखित होणार आहे तो म्हणजे यापूर्वी निवडणूक ही सत्तेच्या लाभाची ढेकर दिलेले आणि उपाशी मेलेले जणू यांच्यामध्येच झाली. ढेकर दिलेले हे संख्येने कमी आहेत मात्र ते सातत्याने नेतृत्वाच्या भोवती काडीमात्र संघटन कौशल्य नसताना गोंडा घोळत असतात. शिवाय ते जनाधार टिकवण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत. आणि उपाशी मेलेले हे स्वतः नाराज इतके आहेत की ते आजूबाजूच्या लोकांना देखील नाराजीमध्ये रूपांतरित करू शकतात. ही बाब एका कोणत्या पक्षाची नाही तर ही समस्या सर्वच पक्षांची आहे. विरोधक म्हणतात आम्ही यशस्वी झालो ते सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे तर सत्ताधारी पक्षातील काही जणांचे मत आहे की अप्पर कार्यालयाचा मुद्दा आम्हाला नडला. मात्र केवळ याच मुद्द्याला धरून अपयशाची गणिते गृहीत धरली जाऊ शकत नाहीत. कारण नाराजी ही कोणा व्यक्ती विरोधात एका निर्णयाविरोधात नव्हती तर सत्तेच्या लाभातील बेसावध सिस्टीम बाबतही देखील होती हे देखील नाकारता येणार नाही.

                                                      नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले सर्वपक्षीय चेहरे..


                                                                             राधाबाई युवराज कांबळे,
शितल क्षिरसागर, स्मिता कोकणे, उज्वला कांबळे, यशोदाताई कांबळे, रजनी कांबळे, शोभा सोनवणे,लक्ष्मी खंदारे, वर्षा क्षीरसागर, अँड. सोनल जानराव, प्राची सोनवणे, प्राजक्ता आखाडे, रमा आठवले, डॉ. धन्वंतरी आवारे, सपना क्षीरसागर.

Reactions

Post a Comment

0 Comments