सोलापूर जिल्ह्यात केवळ नऊ कारखान्यांचे गाळप सुरू; ३८ पैकी ३४ साखर कारखान्यांना गाळपाची परवानगी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात २०२४-२०२५ मध्ये ३८ पैकी ३४ साखर कारखान्यांना गाळप परवानगी मिळाली असून त्यापैकी नऊ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. उर्वरित साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे देणे दिल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही.
शेतकऱ्यांना आश्वासन देत विनापरवाना गाळप सुरू केल्यास कारवाई केल्यास जाणार आहे, असे पुण्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे.
यंदाच्या हंगामात जवळपास १३० मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक साखर कारखान्यात गाळप सुरू झाल्याचे सोलापूर विभागाच्या वतीने सांगितले आहे. २०२३-२०२४ मध्ये पाऊस कमी असल्याने ऊस लागवड शंभर टक्के झाली नाही. दुष्काळी स्थितीमुळे यंदा ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात दोन लाख चाळीस हजार हेक्टर होऊन अधिक क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दोन लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली होती.
यंदा लागवड क्षेत्र जवळपास २० हजार हेक्टरने जास्त आहे. मात्र पावसाने दांडी मारल्याने ऊस उत्पादन तीस हजार हेक्टरने घटेल, अशी शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने यंदा पंचवीस लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने १२५ ते १३० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सदाशिवनगर शंकर सहकारी साखर कारखाना, श्रीपुरचा सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखाना, सोलापूरचा सिद्धेश्वर उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिद्धनाथ, लोकमंगल, जयहिंद, गोकुळ, मंगळवेढ्यातील संत दामाजीपंत, अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री, लक्ष्मी, माढा तालुक्यातील म्हैसगावचा विठ्ठल शुगर, करमाळा तालुक्यातील आदिनाथ, कमलादेवी आदीसह सर्व साखार कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. आत्तापर्यंत सरासरी नऊ ते दहा टक्के गाळप पूर्ण होताना दिसून येत आहे. तीन ते चार महिने गाळप हंगाम चालणार असून ऊस पळवणे सुरू असल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवण्यात यावी, असे खेमनार यांनी सांगितले आहे.
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात १५ नोव्हेंबर ते आजतागायत सात लाख ५५ हजार २५६ मेट्रिक टन इतका ऊस गाळप झाला आहे. याचे साखर उत्पादन पाच लाख २९ हजार २२० क्विंटल इतके झाले आहे. सोलापूर विभागात सात लाख ६६ हजार ५६४ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन सहा लाख ३४ हजार ९९५ क्विंटल साखरेचे उत्पन्न निघाले आहे, असे कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे.
0 Comments