सहदुय्यम निबंधक कासेवाड यांची चौकशी करा- रोहन सुरवसे पाटील
पुणे (कटूसत्य वृत्त):- हवेली क्र. १३ चे सहदुय्यम निबंधक कासेवाड यांनी तुकडे बंदी, तुकडे जोड कायद्याचा व रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केली असून, त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे- पाटील यांनी केली आहे.
सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांना सुरवसे पाटील यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सुधीर बोंद्रे, कृष्णा साठे, ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते. सुरवसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून या कार्यालयामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे हजारो दस्तनोंदणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये बनावट एन. ए. ऑर्डर, बनावट भोगवटा प्रमाणपत्र तसेच बोगस बेचाळीस 'ब'च्या एन. ए. ऑर्डरच्या आधारेसुद्धा शेकडो दस्त नोंदविण्यात आले आहेत. अनधिकृत प्लॉटमधील लिहून देणार त्याच गटातील आहे. परंतु लिहून घेणार त्याच गटातील नसताना देखील बोगस हिस्सेदार दाखवून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी केली आहे. काही ठराविक एजंटला जवळ करून सक्षम प्राधिकरणाची परवानगी आणि महारेरा नोंदणी क्रमांक नसल्यास अशा बांधकामांतील सदनिकांची नोंदणी करण्यात येऊ नये. अशाप्रकारचे हजारो दस्त करून देखील यावर वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणाची विशेष पथकानुसार चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, असे रोहन सुरवसे-पाटील यांनी म्हटले आहे.
0 Comments