शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा - किरनळ्ळी
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- हरित क्रांतीनंतर रासायनिक खते व कीटक, बुरशीनाशकांचा बेसुमार वापर केल्याने कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर द्यावा, असे आवाहन 'आत्मा'चे संचालक अशोक किरनळ्ळी यांनी केले.
श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने होम मैदानावर भरवण्यात आलेल्या सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन किरनळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते. यावेळी व्यासपीठावर श्री सिध्देश्वर यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते, सिध्देश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सिध्देश्वर बमणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले,
जि. प. चे कृषी विकास अधिकारी हरिदास हवळे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे उपस्थित होते. प्रास्ताविकात सिध्देश्वर कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली.
किरनळ्ळी म्हणाले, राज्यात ८० टक्क्यांहून अधिक शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. या शेतकऱ्यांना पाणी, वीज, मजूर व उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळण्याच्या समस्या आहेत. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. 'आत्मा'च्या माध्यमातून वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी कसा करता येईल, याचा शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी अवजारांवर ६० ते ८० टक्के अनुदान आहे. ड्रोनसारखे नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. हरित क्रांतीनंतर रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने पंजाबसारख्या राज्यात कॅन्सरचे रुग्ण वाढले. राज्य शासनाने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना आणली आहे. उपलब्ध संसाधनातून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन करून राज्यात २५ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काडादी म्हणाले, गेल्या ५४ वर्षांपासून सिध्देश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन भरवण्यात येते. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्याचे स्वरूप बदलून मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांपर्यंत कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान पोहोचावे, यासाठी आणखीन भव्य प्रमाणात हे प्रदर्शन भरवण्याचा संकल्प आहे. शहरी भागातील गृहिणींसाठी किचन गार्डन, व्हर्टिकल फार्मिंगची ओळख व्हावी याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनासाठी शासनाच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त गिरीश गोरनळ्ळी, काशीनाथ दर्गोपाटील, विश्वनाथ लब्बा, बाळासाहेब भोगडे, डॉ. राजेंद्र घुली, मल्लिकार्जुन कळके, प्रभूराज मैंदर्गीकर, सुरेश म्हेत्रे, रतन रिक्के यांच्यासह सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे सिध्दाराम चाकोते, संचालक शिवानंद पाटील, राजशेखर पाटील, तम्मा मसरे, कृषी विज्ञान केंद्राचे लालासाहेब तांबडे, आत्माचे राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. श्री सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त पशुपतिनाथ माशाळ यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments