लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम -शाळकरी मुलांसमवेत "कृषी शिक्षण दिन" साजरा
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 3 डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले राष्ट्रपती आणि पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त 3 डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिन साजरा केला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ने हा दिवस विद्यार्थ्यांना कृषी आणि संबंधित विज्ञानांमध्ये रुची वाढवण्यासाठी तसेच कृषी व कृषी संलग्न व्यवसायभिमुकता वाढवण्यासाठी साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो. लोकमंगल कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्ष पदवीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांनी हा दिवस सोलापूर शहरातील नामांकित अशा प्रिसिजन इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्या समवेत साजरा केला. सदरील कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. शिवकुमार वरारकर यांनी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा चढता आलेख आणि कृषी शिक्षण क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी चित्रफितीच्या माध्यमातून सांगितली. याप्रसंगी लोकमंगल कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील मॉड्यूल च्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे कार्यरत असलेल्या आणि स्वतः उत्पादित केल्या जाणाऱ्या विविध कृषी उत्पादनाविषयी उपस्थितांना जागृत केले. यात प्रामुख्याने गांडूळ खत निर्मिती, रेशीम शेती, रोपवाटिका व्यवस्थापन, भाजीपाला उत्पादन, दुग्ध प्रक्रिया, माती पाणी तपासणी, मशरूम उत्पादन आणि बायो फर्टीलायझर निर्मिती याबाबत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. यात मीनल कस्तुरे, अंकिता रेड्डी, कुमुदा राज, ओंकार भाले, अझिझ काझी, अक्षय होनमाने आणि उत्कर्ष लाड यांनी सखोल व सविस्तर असे मार्गदर्शन चित्रफितीच्या माध्यमातून केले आणि उपस्थित सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाबाबत जागृत केले. कार्यक्रमाचा शेवट हा उत्कर्ष लाड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. यानंतर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रिसिजन इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रक्षेत्राला भेट देऊन तेथील पीक पद्धती त्यात करण्याजोग्या विविध बदलांबाबत तेथील समन्वयक व व्यवस्थापनास योग्य त्या सूचना चर्चासत्राच्या माध्यमातून दिल्या. यावेळी प्रा. शिवकुमार वरारकर, प्रा. शुभांगी काळे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय होनमाने, सचिन मरकड, वरद औंधे, उत्कर्ष लाड आणि दिव्या कोरेकर यांनी देखील बाग व्यवस्थापन याबाबत माहिती विशद केली. सदरील भेटीचे आयोजन लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कृषी शिक्षण दिन साजरा करण्यासाठी प्रिसिजन इंग्रजी माध्यम शाळेचे प्रमुख श्रीनिवास बुरा तसेच शिक्षक वृंद सुनील नवले, नंदकुमार स्वामी, सुधाकर गायकवाड, पल्लवी येळसंगी, रमा कोनापुरे आणि प्रियंका मिरजकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील कृषी शिक्षण दिन संपन्नतेसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्रिसिजन इंग्रजी माध्यम शाळेतील एकूण १०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कृषी शिक्षण देवाणघेवाण करण्यासाठी आयोजित स्तुत्य उपक्रमात लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ३२ विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य दिले.
0 Comments